मुंबई - ज्या मुद्द्यांना मुख्यमंत्री फडणवीस वगैरे मंडळी प्रचारात हात लावीत नाहीत त्या मुद्द्यांना उचलू नये अशी बंधने कोणी विरोधी पक्षांवर घातलेली नाहीत, पण काँग्रेस पक्षाचा सेनापतीच युद्धभूमीवरून पळ काढतो व बँकॉकला जाऊन बसतो. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ता रणात आणि मनात अशा दोन्ही ठिकाणी पराभूत होताना दिसत आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार निक्रिय आहे असे गांधी म्हणतात. मग आपण स्वतः किती क्रियाशील आहात याचाही हिशेब द्या. मेलेल्या विरोधकांनी स्वतःच्या राजकीय व नपुंसकतेवर आधी बोलावे. सरकार निक्रिय ठरले असेल तर त्याचा निर्णय जनताजनार्दन घेईल अशा शब्दात सामना अग्रलेखातून काँग्रेससह विरोधी पक्षांचा समाचार घेण्यात आला आहे.
तसेच सरकार निक्रिय आणि कुचकामी असेल तर विधानसभा निवडणुकीत जनता त्यांचा समाचार घेईल. प्रश्न इतकाच आहे की, संपूर्ण काँग्रेस पक्ष मेलेल्या अजगरासारखा निपचित आणि निक्रिय पडून असताना राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारला निक्रिय ठरवले त्याचे आश्चर्य वाटते असा टोला शिवसेनेने राहुल गांधींना लगावला आहे.
सामना अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे
- लोकसभा निवडणुकांपासून गायब झालेले राहुल गांधी अखेर प्रकट झाले. मधल्या काळात ते बँकॉक-पटाया भागात गेले व तेथे अदृश्य झाले. बँकॉक ही जागा काही प्रतिष्ठत राजकीय नेत्यांनी जाऊन आराम करण्याची नाही. त्यामुळे गांधी बँकॉकला नक्की कशासाठी गेले?
- महाराष्ट्र आणि हरयाणातील काँग्रेस पक्ष एकाकी झुंज देत असताना त्यांचा नेता बँकॉकमध्ये आराम फर्मावत होता. त्याची बोंब होताच राहुल गांधी हे महाराष्ट्राच्या प्रचारात अवतरले. राहुल गांधी यांच्याविषयीचा संभ्रम त्यामुळे कमी झाला.
- लोकसभा निवडणूक निकालाच्या धक्क्यातून राहुल गांधी सावरले नाहीत व त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचा राजीनामा दिला. तेव्हापासून काँग्रेस हा बिन मुंडक्याचा पक्ष म्हणून वावरत आहे.
- काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सोडून राहुल गांधी बँकॉक, युरोप वाऱ्या करतात व दुसऱ्यांना निक्रिय म्हणतात. काँग्रेसला गेल्या चार महिन्यांत अध्यक्ष निवडता आला नाही याचे कारण आधी सांगा. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस महाराष्ट्रात इतका निक्रिय ठरला की, विरोधी पक्ष नेताच फौजफाटय़ासह भाजपात विलीन झाला.
- महाराष्ट्रात प्रश्न नक्कीच आहेत. काही प्रश्न अचानक निर्माण होतात. अशावेळी जनतेचा आवाज बुलंद करणारा विरोधी पक्ष सक्रिय असावा लागतो. तो विरोधी पक्ष गेल्या पाच वर्षांत दिसलाच नाही व अशा निक्रिय आणि बेदखल विरोधकांचे नेते राज्य सरकारला निक्रिय ठरवून मोकळे होतात यास काय म्हणावे?
- भाजप व इतर नेते महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी इतर मुद्दे पुढे करून दिशाभूल करतात असे गांधी म्हणत असतील तर ते विरोधी पक्षांच्या निक्रियतेचे पाप आहे. महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कोणते? मुळात या सर्व मुद्द्यांशी सध्या राहुल गांधींचा संबंध राहिला आहे काय? म्हणजे विरोधी पक्षांच्या बोंबलण्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही.
- एक वेळ राज्यकर्त्यांवरचा विश्वास उडाला तर चालेल, पण लोकशाहीत विरोधी पक्षावरचा विश्वास उडता कामा नये ही भावना आहे.