Join us

महाराष्ट्र निवडणूक 2019: बच्चू कडूंनी सुचवली भन्नाट युक्ती; भाजपा-शिवसेना दोघांचीही होईल 'स्वप्नपूर्ती'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 5:05 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : शेतकऱ्यांना मोठी मदत जाहीर करावी, अशी मागणी प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंनी केली आहे.

मुंबई- राज्यात सेना-भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही सरकार स्थापन झालेलं नाही. सत्तावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये कमालीची चढाओढ दिसत आहे. भाजपा शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायला तयार नाही, तर शिवसेनाही मुख्यमंत्रिपदावर अडून बसली आहे. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. एकीकडे ओल्या दुष्काळानं शेतकरी हवालदिल झालेला आहे. दुसरीकडे सेना-भाजपा बहुमत असूनही सत्ता स्थापन करत नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठी मदत जाहीर करावी, अशी मागणी प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंनी केली आहे.तसेच देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेत प्रवेश करावा आणि मुख्यमंत्री व्हावं, असंही बच्चू कडूंनी सुचवलं आहे. सुधीर मुनगंटीवार फडणवीस शिवसैनिक असल्याचं सांगतात, पण त्यांची शिवसेनेत प्रवेश करून मुख्यमंत्री होण्याबाबत काहीच हरकत नसावी, असंही ते म्हणाले आहेत. देशात भाजपा मोठा पक्ष आहे आणि शिवसेना-भाजपाचं 25 वर्षांचं नातं आहे. मोठा भाऊ म्हणून भाजपा पुढे येऊन काही पावलं टाकत असल्यास राज्यासाठी ते अधिक चांगलं होईल. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल. आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हायला हवा. दिलेल्या शब्दावर आम्ही कायम राहणार आहोत. प्रहारच्या निवडून आलेल्या दोन्ही आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. आमचं प्राधान्य हे शिवसेनेलाच राहील याबाबत दुमत नाही. अमित शाह आणि उद्धव ठाकरेंमध्ये जे बोलणं झालंय किंवा जो भाजपानं शब्द दिलाय तो पाळला पाहिजे. तसेच भाजपानं आणखी ताणू नये, असा सल्लाही बच्चू कडूंनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.  

शेतकऱ्याच्या डोक्यात फक्त जगणं आहे. शेवटच्या क्षणात हा पाऊस आल्यानं हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलं. त्याला या राजकारणी लोकांकडूनच अपेक्षा आहे. तुम्ही काय असेल ते करा. पण मदत तर जाहीर करा, तुम्ही किती मदत देणार ते तरी आधी जाहीर करा, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. शेतकऱ्याच्या मुलींचं लग्न असेल, मुलांचं शिक्षण किंवा पुढच्या रब्बी पिकांची व्यवस्था त्यांना करायची असते. मुख्यमंत्री या राज्याला मिळाला किंवा नाही, तर राज्य थांबणार नाही. शेतकरी मेला तर राज्य थांबल्याशिवाय राहणार नाही. सत्ता स्थापनेसाठी कोणाला आमंत्रित करावं याऐवजी राज्यपालांनी शेतकऱ्यांना कशी मदत देता येईल ही भूमिका घेतली पाहिजे. यावर निर्णय न घेतल्यास राजभवनासमोर आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराही बच्चू कडूंनी दिला आहे.  

तर दुसरीकडे आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यांनी भाजपासोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली. लोकसभा निवडणुकीवेळी ठरल्याप्रमाणे सर्व काही व्हावं. त्यापेक्षा मला अधिक काही नको. मुख्यमंत्रिपदाबद्दल फडणवीस यांनी केलेलं विधान चुकीचं आहे. याबद्दल भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलायला मी तयार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मातोश्रीवर फोन उचलले जात नसल्याचं वृत्त काही दिवसांपासून येत होतं. मात्र आता उद्धव ठाकरेंनी चर्चेची तयार दर्शवली आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी फोन करावा. त्यानंतर पुढील चर्चा करता येईल, अशी भूमिका उद्धव यांनी मांडली आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019बच्चू कडूशिवसेनाभाजपाउद्धव ठाकरे