Maharashtra Election 2019: तिकीट का कापलं माहीत नाही; पक्षाने कारण सांगितलं नाही; विनोद तावडे संधीच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 11:54 AM2019-10-04T11:54:38+5:302019-10-04T11:54:59+5:30
भाजपाचे नेते विनोद तावडे यांचं पक्षानं तिकीट कापलेलं आहे.
मुंबई- भाजपाचे नेते विनोद तावडे यांचं पक्षानं तिकीट कापलेलं आहे. त्यांच्याऐवजी सुनील राणे यांना बोरिवली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यानंतर विनोद तावडेंनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, 1985पासून मी पक्षाचं काम करतोय. मला उमेदवारी का नाही यात माझी काही चूक की पक्षाची काही चूक झालीय, याचं विश्लेषण करण्याची ही वेळ नाही. मी अमित शाहांशी यासंदर्भात नक्कीच चर्चा करेन.
मी संघाच्या शिस्तीनं विद्यार्थी दशेत काम करत आलो आहे. राजकीय क्षेत्रात काम करताना बऱ्याचदा मानसिकता बदलावी लागते. संघाला आणि विद्यार्थी परिषदेला अभिप्रेत असलेल्या दृष्टीनं माझं काम सुरूच आहे. राष्ट्र निर्माणाच्या कार्यात जे जे येईल ते गंतव्य स्थानापर्यंत घेत जायचं आहे. मी विरोधी पक्षनेता झालो, त्यानंतर मंत्री झालो. बरेच जण आमदार पण नाहीत आणि मंत्री पण नाहीत तरीही पक्षाचं काम करतायत. संघाच्या विद्यार्थी परिषदेत असल्यापासून समाजाच्या हिताचं काम करण्याची शिकवण नेहमीच दिली गेली आहे. मला उमेदवारी न देण्याची काही कारणं नक्कीच असतील, पण निवडणुकीच्या धामधुमीत पक्ष नेतृत्वाशी बोलता आलेलं नाही. त्यामुळे पक्ष नेतृत्वावर काही वेळा विश्वास ठेवावा लागतो. पाच वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराची एकही गोष्ट नाही. पक्षनेतृत्व जे निर्णय घेतं, त्याची चर्चा होतच असते. पण मी काम करणं थांबवणार नाही. मी संघ आणि भाजपाला अभिप्रेत असलेलंच काम सुरूच ठेवेन. चुकलं असलं तरी पक्ष पुन्हा संधी देईल, अशी आशा असल्याचंही तावडे म्हणाले आहेत.
भाजपानं विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर केलेली आहे. या यादीत मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसेंच्या ऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे हिला उमेदवारी देण्यात आली आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा पत्ता कट करण्यात आला असून, त्यांच्या जागी भाजप नेते सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. भाजपानं चौथ्या यादीत सात उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. तर दुसरीकडे राज पुरोहित यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
तसेच रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना कुलाब्यातून तिकीट देण्यात आलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी इथूनच उमेदवारी मिळण्याची शक्यता असून, अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची चर्चा आहे. भाजपाने 4 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यामध्येही भाजपा नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडेंना तिकीट देण्यात आलं नाही. या 4 उमेदवारांना तिकीट देण्यात आलं आहे. तिसऱ्या यादीत मालाड पश्चिममधून रमेश ठाकूर, रामटेकमधून मल्लिकार्जुन रेड्डी, साकोली येथून परिणय फुके, शिरपूर येथून काशीराम पावरा यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे चौथ्या यादीतही एकनाथ खडसे आणि विनोद तावडेंचं नाव नाही.