महाराष्ट्र निवडणूक 2019: अहंकार भल्याभल्यांना घेऊन बुडतो; संजय राऊत यांचा हा इशारा नेमका कोणाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 10:30 AM2019-11-01T10:30:32+5:302019-11-01T10:42:55+5:30
सत्तेच्या वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे.
मुंबई: राज्यातल्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीला सत्ता स्थापनेसाठी बहुमत मिळाले. तरीसुद्धा सत्तेच्या वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यातचं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अहंकार हा भल्याभल्यांना घेऊन बुडतो असं म्हणत ट्विट केलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांना नेमका हा इशारा कोणाला द्यायचा आहे हे मात्र काही दिवसातचं स्पष्ट होणार आहे.
शिवसेनेनं ठरल्याप्रमाणे सत्तेत 50-50चा आग्रह धरत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचीही मागणी केली होती. परंतु शिवसेनेची ही मागणी धुडकावून अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद देण्याबाबत कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यानंतर मुख्यमंत्र्यांनी तसं बोलायला नको होतं असं म्हणत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती.
महाराष्ट्र निवडणूक 2019: ''मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार; ही तर जनतेची इच्छा''
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला १०५ जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्या तरी भाजपाला निर्णायक यश न मिळाल्याने शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या लागल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे शिवसेना व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. मात्र आधी फार्म्युला नंतर सत्तास्थापना अशी भूमिका शिवसेनेने घेतली असून अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे. अन्यथा दुसरा पर्याय असल्याचा सूचक इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिला आहे.
संजय राऊत- शरद पवार भेट; शिवसेनेचा भाजपावर दबाव, चर्चेला उधाण
*साहिब...*
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 1, 2019
*मत पालिए, अहंकार को इतना,*
*वक़्त के सागर में कईं,*
*सिकन्दर डूब गए..!*
राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी भाजपा व शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरुन चढाओढ सुरु आहे. एकीकडे शिवसेनेनं थेट मुख्यमंत्रीपदावरचं दावा ठोकला आहे. तर भाजपा मुख्यमंत्रिपदासह महत्वाची खाती शिवसेनेला सोडण्यास तयार नाही. त्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार स्थापनेचा मुहुर्त लांबत चालला आहे.