मुंबई : वाकलेली कंबर, थरथरणारे हात आणि क्षीण नजरेने मतदान केंद्रावर सकाळीच हजेरी लावणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल, असा होता. रांगेत त्यांना फार काळ थांबून राहावे लागू नये, त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मतदान केंद्रांवरही विशेष काळजी घेण्यात येत होती. मात्र, तब्येतीची कुरबुर न करता घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावणाºया वयोवृद्ध मतदारांनी तरुणांपुढे आदर्श ठेवला.
माहिम विधानसभा मतदारसंघातही हेच चित्र आज दिसून आले. दादर पश्चिम येथील बालमोहन विद्यामंदिर या शाळेत तासकर दाम्पत्य उत्साहाने मतदान करण्यासाठी सोमवारी आले होते. यापैकी मोहन तासकर हे चक्क ८५ वर्षांचे तर स्वाती तासकर या ८३ वर्षांच्या आहेत. गेली ६० वर्षे दादर परिसरात राहणारे तासकर दाम्पत्य न चुकता प्रत्येक निवडणुकीला मतदान करीत असते.
मुलगा आणि सुनेचा हात धरून तासकर दाम्पत्य मतदान केंद्रावर आले होते. एक मतही बदल घडवून आणू शकते, असा विश्वास त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. सायन कोळीवाडा येथे महेंद्र कोटक (वय ७६) यांच्याबरोबरच असे बरेच ज्येष्ठ नागरिक काठी टेकत तर कोणी मुलांच्या खांद्याचा आधार घेत, राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दिसून येत होते.
शस्त्रक्रियेनंतर बजावला मतदान हक्क
पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर पाच आठवडे तिला आराम करण्याचा सल्ला डॉक्टरने दिला आहे. मात्र, पाच वर्षांमध्ये एकदाच मिळणारा मतदानाचा हक्क तिला सोडायचा नव्हता. त्यामुळे पतीच्या मदतीने तिने मतदान केंद्र गाठले. दादर पश्चिम येथील मतदार अमृता देसाई यांनी बालमोहन विद्यामंदिर येथे मतदान केले.
ईव्हिएम मशीन बंद
मुंबई : जोगेश्वरी पूर्व मध्ये सकाळच्या सुमारास काही मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी पाहायला मिळाली. यानंतर दुपारच्या सुमारास थोडी गर्दी वाढली, तर नंतर पुन्हा गर्दी कमी झाली. जोगेश्वरी पूर्वतील बांद्रा प्लॉट येथील बुथ क्रमांक २४० वर एक तास ईव्हीएम मशीन बंद पडली होती. यानंतर एका तासानंतर ही मशीन सुरू करण्यात आली. जोगेश्वरी पूर्वतील नटवरनगर येथील सूरजबाग शाळेच्या केंद्रामध्येही सकाळच्या सुमारास तुरळक गर्दी होती. नंतर हळूहळू गर्दी वाढायला लागली. बालविकास शाळेतील ३५ मुले दिव्यांगांना मदत करत होते.
व्हिलचेअरचा आधारवृद्ध व आजारी मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर व्हीलचेअरची व्यवस्था केली होती़ शिवडी येथील मतदान केंद्रावर एका वृद्ध महिलेला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवताना आयोगाचे कर्मचारी़