मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला आहे. आम्हाला जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची सुसंधी महाराष्ट्राच्या जनतेनं दिली आहे. भाजप शिवसेनेनं तातडीनं सरकार स्थापन करावं, राज्याच्या परिस्थितीवर बोलण्यासारखं नाही, आम्ही जबाबदार विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडू असं शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत सांगितले आहे. मात्र याचसोबत अन्य निर्णय घ्यायचा झालाच, तरी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र घेईल असं सांगत शरद पवारांनी सत्तास्थापनेवर सस्पेन्स कायम ठेवला आहे.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, संजय राऊतांकडून कोणताही प्रस्ताव आला नाही, जबाबदार विरोधीपक्ष म्हणून भूमिका निभावण्याची तयारी आहे. युतीने लवकर निर्णय घ्यावा. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने तातडीने मदत करावी, पेरणीसाठी कर्ज द्यावं, विमा कंपन्यांची बैठक घेऊन सूचना द्याव्या. मी अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाचा दौरा करणार आहे, ती स्थिती पाहून केंद्राकडून मदत मिळवायचा प्रयत्न करेल, विमा कंपन्या त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडायला तयार नाही, त्यामुळं केंद्र सरकारने विमा कंपन्यांची बैठक घ्यावी त्यांना सूचना द्याव्या असं पवारांनी सांगितले.
त्याचसोबत गडकरी आणि अहमद पटेल यांच्या भेटीबाबत बोलताना पवार म्हणाले की, गडकरींकडे कुणी गेलं असेल तर ते जरुर रस्त्यांच्या कामासाठी गेलं असणार आहे. अहमद पटेल जबाबदार व्यक्ती असून ते दुस-या कुठल्या कारणासाठी भेटले असतील असं वाटत नाही अशीही पुस्तीही पवारांनी जोडली आहे.
दरम्यान, बहुमत नसतानाही अमित शाहांनी मागच्या काळात सरकारं स्थापन केली आहेत, मग महाराष्ट्रात ते लक्ष घालत नाहीत असा प्रश्न पत्रकारांनी पवारांना विचारला. त्यावर या सत्तास्थापनेच्या कौशल्याची तुमच्याप्रमाणे आम्हीही आतुरतेनं वाट पाहतोय. त्यांनी सरकार बनवावं असं शरद पवारांनी सांगितले.
तसेच अयोध्येचा निकाल लागणार आहे तेव्हा कोणत्याही समजाने आपल्या विरोधात निकाल लागला अशी भावना करून घेऊ नये. कायदा हातात घेऊ नये अयोध्येचा निकाल लागल्यानंतर कुठल्याही घटकांनी हा निर्णय आपल्याविरोधात निर्णय लागला अशी भूमिका घेऊ नये, कुणीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नये , शांततेचं आवाहन शरद पवारांनी केलं.