ईव्हीएम हॅकिंग : मतदान केंद्र आणि स्ट्राँगरूमजवळील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची राष्ट्रवादीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 16:24 IST2019-10-20T16:22:37+5:302019-10-20T16:24:09+5:30
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड करणे अशक्य असल्याची हमी निवडणूक आयोगाकडून वारंवार देण्यात आली असली तरी विरोधी पक्षांचा ईव्हीएमवर विश्वास बसलेला नाही.

ईव्हीएम हॅकिंग : मतदान केंद्र आणि स्ट्राँगरूमजवळील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची राष्ट्रवादीची मागणी
मुंबई - ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पूर्णपणे सुरक्षित असल्याचा आणि हॅकिंग करून त्याच्यामधील मतदानाच्या आकडेवारीत कुठल्याही प्रकारची छेडछाड करणे अशक्य असल्याची हमी निवडणूक आयोगाकडून वारंवार देण्यात आली असली तरी विरोधी पक्षांचा ईव्हीएमवर विश्वास बसलेला नाही. दरम्यान, उद्या होणाऱ्या मतदानापासून मतमोजणीपर्यंत मोबाईल आणि इंटरनेटद्वारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन हॅक होण्याची शक्यता गृहित धरून मतदान केंद्र आणि स्ट्रॉगरूमपासून तीन किमी परिसरातील इंटरनेटसेवा बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी सोमवारी मतदान होणार आहेत. यावेळी भाजपा आणि शिवसेना महायुती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी यांच्यात निवडणूकपूर्व आघाड्या झाल्याने महायुती आणि आघाडीमध्ये मुख्य लढत होणार आहे. दरम्यान, मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन हॅक करण्याची शंका राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत प्रत्येक पोलिंग बुथ तसेच जिथे ही उपकरणं ठेवली जातात अशा प्रत्येक स्ट्रॉन्ग रुम्सच्या 3 कि.मी. परिसरातील इंटरनेट सेवा बंद ठेवली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव शिवाजीराव गर्जे यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे.
दरम्यान, निवडणुकांदरम्यान इतर राज्यांमध्ये निवडणुकीदरम्यान अशा प्रकारे इंटरनेट सेवा खंडित करून खबरदारी घेतली गेल्याचे निरीक्षण आहे, असेही राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.