महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : डोळ्यात अंजन घालणारा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 03:08 AM2019-10-25T03:08:27+5:302019-10-25T06:10:18+5:30
Maharashtra Election 2019: महाराष्ट्र व हरयाणा विधानसभांसह अनेक राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचा आशावाद फारसा उंचावणारे नसले तरी त्यांनी भाजप युतीच्या उत्साहातही फारशी भर घातलेली नाही.
महाराष्ट्र व हरयाणा विधानसभांसह अनेक राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचा आशावाद फारसा उंचावणारे नसले तरी त्यांनी भाजप युतीच्या उत्साहातही फारशी भर घातलेली नाही. हरयाणात आठ अपक्षांनी भाजपला पाठिंबा देण्याचे ठरविल्याने तेथे त्यांचे सरकार स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ९० सभासदांच्या या विधानसभेत भाजपला ४० तर काँग्रेसला ३६ जागा मिळाल्या आहेत. अन्य जागी स्थानिक व अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती २२० पर्यंत जाईल, असे भाकीत भाजपचे नेते, प्रवक्ते करीत होते. प्रत्यक्षात भाजप-शिवसेना युतीला १६० चा आकडा गाठतानाही दमछाक झाली आहे. काँग्रेस आघाडीत राष्ट्रवादीने एवढी पडझड होऊनही पूर्वीपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर जिल्ह्यात मुसंडी मारून ७ जागा जिंकल्या आहेत. शिवाय एमआयएम, मार्क्सवादी, जनसूर्य शक्ती, लोकसंग्राम, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनीही काही जागा जिंकल्या आहेत. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ ही स्वत:ची प्रतिज्ञा खरी केली आहे.
मात्र सेनेच्या मोठ्या संख्येमुळे त्यांच्या सरकार निर्मितीत आरंभी अडचणी येण्याची शक्यता आहे. सेनेने आपल्याला निम्मी मंत्रिपदे मिळावी व आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद द्यावे, ही मागणी फार पूर्वीपासून चालविली आहे. (मात्र सेना आपला हेका फार काळ चालू ठेवणार नाही असे ‘ईडी’च्या अभ्यासकांचे मत आहे.) भाजपचा निवडणुकीपूर्वीचा उत्साह अनाठायी होता हे निकालांनी सिद्ध केले आहे. समोरच्या व्यक्तीला गृहीत धरण्यामुळे काय होते हे या निकालाने सप्रमाण सांगितले आहे.
भाजप वाढवणाऱ्या अनेक नेत्यांना घरी बसवून, ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी सतरंज्या उचलल्या त्यांना बाजूला सारून काँग्रेस, राष्ट्रवादीमधील नेत्यांना जवळ करण्याची वृत्ती भाजपच्या चांगलीच अंगलट आली आहे. जे आपले नव्हते तेही त्यांचे झाले नाहीत आणि जे आपले होते ते नाराजीमुळे दूर गेले अशी विचित्र अवस्था हा निकाल स्वीकारताना पक्षाची झाली आहे. सत्ता आल्यानंतर आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल, पक्षनेतृत्व आपला विचार करेल ही भावना कार्यकर्त्यांमध्ये असणे अत्यंत स्वाभाविक आहे. या भावनेलाच तडा देण्याचे काम पक्षनेतृत्वाने केले.
पक्ष बहुजनांमध्ये नेला ते एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्यासारखे नेते असोत अथवा चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांच्यासारखे मंत्री, त्यांना ज्या पद्धतीने तडकाफडकी दूर केले गेले ते पक्षासाठी झटणाऱ्यांना झटका देणारे ठरले. जर आपण पाच वर्षे चांगले काम केले आहे, ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ यावर श्रद्धा ठेवून काम केले आहे तर मग अन्य पक्षांतल्या नेत्यांना आपल्याकडे घेण्याची गरज काय होती. आम्ही विकासाचे राजकारण करतो अशी भूमिका एकीकडे घ्यायची आणि दुसरीकडे सतत ३७० कलमावर तारस्वरात सगळ्या नेत्यांनी बोलत राहायचे, हे जनतेला आवडले नाही. विधानसभेच्या निवडणुका या स्थानिक प्रश्नांवर होत असतात. त्यांना त्यांचे प्रश्न कोण सोडवतो, आरोग्य, शिक्षण, पाणी, शेती या मूलभूत प्रश्नांकडे सरकार कसे पाहते याची उत्तरे त्यांना हवी असतात.
जातीपातीची समीकरणेही राज्याच्या निवडणुकीत कायम डोके वर काढत असतात. अशा वेळी या सगळ्यांची सांगड घालून काम करण्याची गरज असताना भाजप नेत्यांनीच या निवडणुका भलत्या दिशेला नेल्या. आपण १२२ वरून १०३ वर का आलो, आपल्याच मंत्रिमंडळातील ८ मंत्री का पराभूत झाले याचा आता शांतपणे विचार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. जे भाजपचे झाले तेच शिवसेनेचे. त्यांचेही ६३ आमदार होते, ते ५७ झाले.
सत्तेत राहायचे आणि स्वत:च्याच सरकारवर टीका करायची, ही दुटप्पी वृत्ती शिवसेनेला भोवली. आरे वृक्षतोडीच्या बाबतीत शिवसेनेने घेतलेली भूमिका या वागण्याचे उत्तम उदाहरण. आपल्याकडे पर्यावरण खाते आहे, त्या खात्याचा कॅबिनेट मंत्री काही बोलत नाही आणि आमची सत्ता आल्यानंतर झाडे तोडणाºयांना बघून घेऊ, अशी रस्त्यावरची भाषा सत्तेत राहून करायची, हे करताना आपल्याला कोणी पाहत नाही, अशी स्वत:च समजूत करून घ्यायची, हे जनतेला कळत नाही का? पण स्वत:ला कायम सगळे समजते हा आविर्भाव आपल्याला कधीतरी नडू शकतो हे या निकालाने शिवसेनेला दाखवून दिले आहे.
पक्षासाठी कष्ट करणारे नेते, सदस्य बाजूला सारून तानाजी सावंतसारख्या नेत्याला मंत्रिपद कसे दिले गेले याची चर्चा चविष्टपणे पक्षात होत असताना त्याकडेही दुर्लक्ष करायचे, मंत्र्यांना निवडणुकीच्या तोंडावर ‘लक्ष्य’ ठरवून द्यायचे, यातून पक्ष कसा वाढणार? पक्षासाठी राबणाºयांची स्पंदने टिपण्याचे काम नेतृत्वाने सोडून दिले. याचा परिणाम शिवसेनेच्या जागा कमी होण्यात झाला आहे. तर काँग्रेसची अनास्थाही फारशी योग्य नव्हती. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते हिरिरीने प्रचारात उतरलेच नाहीत, जे आले त्यांच्यात लढण्याचा जोश नव्हता. केलेले तिकिटांचे वाटपही अनेक जागी लोकांचा रोष ओढवून घेणारे होते. राज्यातील अनेक नेते आपापल्या मतदारसंघातच अडकून पडले. ही कसर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भरून काढली. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ते महाराष्ट्रभर ऊन, पावसाची तमा न करता फिरले.
भाजप-शिवसेनेने ही निवडणूक राज्याच्या प्रादेशिक प्रश्नावर होऊ नये यासाठीच प्रयत्न केले. पण शरद पवार यांनी राज्यातील अवर्षण, पावसाचा कहर, शेतकºयांच्या आत्महत्या या गोष्टी निवडणुकीत आणल्या. सरकार त्यामुळे नंतर बचावात्मक पवित्र्यात गेले. त्यामुळे या निकालांचे श्रेय वा अपश्रेय नेमके कुणाला द्यायचे हाच प्रश्न आहे. पाशवी बहुमत नेहमी बेलगाम करते असा जगाचा इतिहास आहे. त्यामुळे जनतेने ते कोणत्याही एका पक्षाला मिळू दिलेले नाही. जनतेने दिलेला आदेश स्पष्ट आहे. तुम्ही आम्हाला गृहीत धरू नका, जे करत आहात ते आम्हाला विश्वासात घेऊन करा, नाहीतर आज मिळालेले यशही पुढच्या वेळी मिळणार नाही, असे या निकालातून जनतेने स्पष्टपणे सांगितले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचा १५ वर्षांचा कारभार जनतेने पाहिला होता. त्यांच्यापेक्षा तुम्ही बरे म्हणून भाजप-शिवसेनेला सत्ता देण्याचे काम जनतेने केले होते. मात्र या जनतेने अजूनही काँग्रेस, राष्ट्रवादीवर पूर्ण विश्वास दाखवला नाही आणि भाजप-शिवसेनेवरचा विश्वास पूर्ण उडाला आहे, असेही सांगितलेले नाही.
मर्यादेत राहा, उतू नका, मातू नका, आमच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, ते सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला तेथे पाठवले आहे, याची जाणीव योग्य भाषेत करून देण्याचे काम मतदारराजाने या निकालाच्या माध्यमातून केले आहे. एकप्रकारे डोळ्यात अंजन घालणारा हा निकाल आहे. त्यामुळे मतदार १०० टक्के अभिनंदनास पात्र आहेत.मर्यादेत राहा, उतू नका, मातू नका, आमच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, ते सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला तेथे पाठवले आहे याची जाणीव करून देण्याचे काम मतदारराजाने केले आहे. डोळ्यात अंजन घालण्याचेच काम या निकालाने केले आहे. त्यामुळे मतदार अशा निकालासाठी अभिनंदनास पात्र आहेत.