Maharashtra Election 2019: ईव्हीएमवर वाटतेय शंका?; तर उमेदवारांनो, घ्या 'अशी' काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 08:40 PM2019-10-07T20:40:51+5:302019-10-07T20:41:38+5:30
विरोधी पक्षांच्या भूमिकेमुळे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव विधानसभा निवडणुकीत उतरण्याचं ठरवलं आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण तापू लागलं आहे. मात्र विरोधी पक्षांकडून ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करण्यात येते. महाराष्ट्रातही मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस व अन्य पक्षांनी एकत्र येत ईव्हीएमविरोधात मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर निकालांवर संशय घेतला जात होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात भूमिका घेत निवडणुकीवर बहिष्कार घालावा अशी मागणी सर्व विरोधकांना केली होती. मात्र राज ठाकरेंची भूमिका कोणत्याही विरोधी पक्षांनी स्वीकारली नाही.
विरोधी पक्षांच्या भूमिकेमुळे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव विधानसभा निवडणुकीत उतरण्याचं ठरवलं आहे. राज्यभरात मनसेने १०० पेक्षा अधिक उमेदवार उभे केले आहेत. २१ तारखेला विधानसभा निवडणुकांचं मतदान हे ईव्हीएमवर होणार आहे त्या पार्श्वभूमीवर 'ईव्हीएम' मध्ये फेरफार केले जाऊ शकतात आणि केले गेले असल्याची शंका राज ठाकरेंना आहे.
त्यामुळे निवडणुकीला सामोरे जात असताना पक्षाला अधिक दक्षता बाळगावी लागेल. ती कशी बाळगायची, राजकीय पक्ष आणि उमेदवार म्हणून आपल्याला काय अधिकार आहेत ह्याविषयी मनसेचे राज्य सचिव आणि निवडणूक कायद्याचे अभ्यासक प्रमोद पाटील ह्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं आहे.