मुंबई- भाजपानंविधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर केलेली आहे. या यादीत मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसेंच्या ऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे हिला उमेदवारी देण्यात आली आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा पत्ता कट करण्यात आला असून, त्यांच्या जागी भाजप नेते सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. भाजपानं चौथ्या यादीत सात उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. तर दुसरीकडे राज पुरोहित यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तसेच रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना कुलाब्यातून तिकीट देण्यात आलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी इथूनच उमेदवारी मिळण्याची शक्यता असून, अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची चर्चा आहे.
तत्पूर्वी भाजपानं 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावांचा समावेश करण्यात आला होता. पहिल्या यादीनंतर भाजपाने 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यानंतर 4 उमेदवारांची तिसरी यादी भाजपाने जाहीर केली असून, आता सात जणांची चौथी यादीही प्रसिद्ध केली आहे. भाजपानं पहिल्या यादीतूनच मुक्ता टिळक यांना कसबा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर अतुल भोसले दक्षिण कराडमधून निवडणूक लढणार आहेत. भाजपाने विद्यमान 11 उमेदवारांच्या आमदारकीचे तिकीट कापले, तसेच 52 विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे.
भाजपाची तिसरी यादी जाहीर, एकनाथ खडसे अन् तावडेंना संधी नाहीच
भाजपाने 4 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यामध्येही भाजपा नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडेंना तिकीट देण्यात आलं नाही. या 4 उमेदवारांना तिकीट देण्यात आलं आहे. तिसऱ्या यादीत मालाड पश्चिममधून रमेश ठाकूर, रामटेकमधून मल्लिकार्जुन रेड्डी, साकोली येथून परिणय फुके, शिरपूर येथून काशीराम पावरा यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे चौथ्या यादीतही एकनाथ खडसे आणि विनोद तावडेंचं नाव नाही.