Maharashtra Election 2019: सरकार फक्त पतंगबाजी व हवाबाजीत मश्गुल; शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 08:10 AM2019-10-16T08:10:18+5:302019-10-16T08:11:00+5:30
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुरामन, अर्थतज्ञ अमर्त्य सेन आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर परखड मते मांडली तेव्हा त्यांना मूर्ख ठरवले गेले. नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांच्यावर ही वेळ येऊ नये.
मुंबई - अभिजित बॅनर्जी यांना कोणतीही राजकीय विचारसरणी नाही. ‘गरिबी हटाव’ हाच त्यांचा पक्ष आहे. त्यांच्या कार्यात ढोंग नाही. देशात गरिबी निर्मूलनाचे राजकीय प्रयोग भाराभर झाले. त्यातून काय हाती पडले? दुष्काळ मुक्तीच्या घोषणा हवेत विरत आहेत. शेतकरी रोज मरत आहेत. नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्था डळमळीत झाली. त्यामुळे दोन कोटींवर लोकांचा रोजगार गेला. म्हणजे गरिबी वाढली. पी.एम.सी. बँकेसारखी प्रकरणे लोकांचे दारिद्रय़ रोज वाढवत आहेत व सरकारे फक्त पतंगबाजी व हवाबाजीत मश्गुल आहेत. त्या सगळ्यांना अभिजित बॅनर्जी यांना दिलेला नोबेल पुरस्कार हे उत्तर आहे अशा शब्दात शिवसेनेने सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका केली आहे.
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुरामन, अर्थतज्ञ अमर्त्य सेन आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर परखड मते मांडली तेव्हा त्यांना मूर्ख ठरवले गेले. नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांच्यावर ही वेळ येऊ नये. अभिजित बॅनर्जी यांनी हाच सिद्धांत जागतिक स्तरावर मांडला. देशाची बदनामी बाहेर जाऊन केली. म्हणून ‘नोबेल’ विजेत्यास अपराधी ठरवू नये! बॅनर्जी यांचे ऐकून मार्ग शोधला तर देशाचा फायदाच आहे असा सल्लाही शिवसेनेने दिला आहे.
सामना अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे
- बॅनर्जी हे हिंदुस्थानी वंशाचे अर्थतज्ञ आहेत, पण अमेरिकेचे नागरिक आहेत. ‘जागतिक दारिद्रय़ निर्मूलनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन’ या विषयावरील त्यांच्या संशोधनासाठी त्यांना ‘नोबेल’ पुरस्कार मिळाला.
- सोप्या भाषेत सांगायचे तर ‘गरिबी हटाव’ ही कल्पना फक्त राजकारण्यांच्या भाषणात, निवडणूक प्रचारातील राहिलेली नाही. जगभरातील गरीबांना ‘अच्छे दिन’ कसे आणता येतील यावर अभिजित बॅनर्जी यांनी संशोधन केले. ‘नोबेल’ हा त्या संशोधनाचा गौरव आहे.
- अभिजित बॅनर्जी यांची मानसिक व शैक्षणिक जडणघडण ही हिंदुस्थानी मातीतच झाली व ‘जेएनयू’ची माती घेऊनच ते पुढील संशोधनासाठी अमेरिकेला गेले. मधल्या काळात ‘जेएनयू’मध्ये जो राजकीय राडा झाला त्यामुळे बॅनर्जी दुःखी झाले.
- जेथे वैचारिक, मानसिक, शैक्षणिक जडणघडण होते अशा संस्थांपासून राजकारण्यांनी लांब राहावे, अशी अपेक्षा बॅनर्जी यांनी व्यक्त केली होती. ‘जेएनयू’त देशद्रोही कृत्ये चालतात, असे तेव्हा संघ परिवारातर्फे म्हणजे भाजप, अभाविपसारख्या संघटनांनी जाहीर केले. पण त्याच जेएनयूमधून एकापेक्षा एक तेजस्वी हिरेदेखील तळपले. त्यातले एक अनमोल रत्न अभिजित बॅनर्जी आहेत.
- हिंदुस्थानी अर्थव्यवस्था त्यांनी फार जवळून अनुभवली आहे. अर्थव्यवस्थेचे मोजमाप शेअर बाजार, स्टॉक एक्सचेंज, जी.डी.पी. अशा शब्दांपुरते मर्यादित नाही. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था सध्या उताराला लागली आहे. नजीकच्या काळात ती सावरण्याची चिन्हे दिसत नाहीत, असे मत अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केले व ते ‘नोबेल’ पुरस्कारानंतर हे सर्व बोलले.
- नोटाबंदी, जी.एस.टी.सारखे निर्णय देशाला, अर्थव्यवस्थेला मारक असल्याचेही त्यांनी वेळोवेळी सांगितले. पण असे बोलणारे हे डराव डराव करणारे डबक्यातले बेडूक किंवा राष्ट्राचे शत्रू असे ठरवले गेले. तरी जागतिक स्तरावर आता बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील सर्वोच्च बहुमान मिळाला.
- अभिजित बॅनर्जी यांची आई मराठी. त्या पूर्वाश्रमीच्या निर्मला पाटणकर. तरीही आम्ही अभिजित बॅनर्जींना जागतिक नागरिक मानतो. त्यांची नाळ हिंदुस्थानशी जोडली आहे व त्यांचे मन जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गुंतले आहे.