मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये अखेरच्या क्षणी युती झाली होती. मात्र, युतीच्या जागावाटपात शिवसेनेला अवघ्या 124 जागा मिळाल्याने शिवसेनेने तडजोड केली. शिवसेना झुकली, शिवसेना लहान भाऊ ठरलां, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, राजकारणात लहान-मोठं असं होतच राहतं, असे हातकणंगले मतदारसंघातील शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी म्हटले आहे. तसेच, शिवसेना हा लहान भाऊ असल्याचं मान्य न करता सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेला हा मोठेपणा असल्याचं माने यांनी म्हटलंय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 124 जागा हा शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतच्या इतिहासात लढवलेला सर्वात कमी आकडा असला तरी यावेळपासून शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार जिंकण्यास सुरुवात होईल, असा दावा केला आहे. मात्र, युतीच्या जागावाटपात शिवसेना हा लहानभाऊ ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि महाराष्ट्रात रंगली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये जागावाटपात शिवसेनेने घेतलेल्या मवाळ भूमिकेबाबत प्रश्न विचारला होता.
शिवसेनेने 124 जागांवर तडजोड का केली, अशी विचारणा केली असता, उद्धव ठाकरे यांनी जागावाटपात झुकती भूमिका घेतल्याचा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले, ''आम्ही 124 जागांवर तडजोड केलेली नाही. आमची अडचण समजून घ्यावी असे आवाहन देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे सातत्याने करत होते. दरम्यान, ही अडचण मी समजून घेतली, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. याबाबत, लहानभाऊ असा प्रश्न खासदार धैर्यशील मानेंना विचारण्यात आला. त्यावर, मानेंनीही हे स्विकारणे अमान्य केले.
''प्रदीर्घ राजकारण पाहिलं तर काँग्रेस पक्षाही जुना पक्ष शिवसेना आहे. इंदिरा गांधीनी तयार केलेल्या काँग्रेस आय पक्षापूर्वीही शिवसेना महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या जनमाणसाच्या ह्रदयाशी जोडलं गेलेलं नातं शिवसेनेचं आहे. लहान-मोठा भाऊ हे राजकारणात होतं राहतं, असे धैर्यशील मानेंनी म्हटलंय. सत्तेची कमाण एकावेळी एका भावाच्या खांद्यावर, दुसऱ्यावेळी दुसऱ्या माणसाच्या खांद्यावर असते. त्यामुळे, लहान-मोठं असं कुणीही असत नाही. सत्ता ही सामान्य माणसाच्या उद्धारासाठी आहे, ती वापरलीच पाहिजे. शिवसेनेनं कायम मनाचा मोठेपणा दाखवलाय. लहान-मोठा हा भेदभाव आमच्या मनात असत नाही. सामान्य माणसाला आधार दिला पाहिजे, येथील प्रश्न संपले पाहिजे, यासाठी हा संघर्ष असल्याचं म्हटलं जातयं.'', असेही मानेंनी सांगितले.