Maharashtra Election 2019: आदित्य ठाकरेंवर केसेस किती?; कुठल्या बँकांमध्ये आहेत खाती?... तुम्हीच बघा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 04:44 PM2019-10-03T16:44:57+5:302019-10-03T16:46:19+5:30
वरळी विधानसभा निवडणूक 2019 -यंदाच्या निवडणुकीच्या या रणांगणात सर्वाधिक लक्ष लागून राहिलं आहे वरळी मतदारसंघाकडे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची राज्यात रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर होऊ लागली आहे. काही इच्छुक बंडखोरीच्या तयारीत आहे तर काही जणांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली म्हणून आनंदात आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची संख्या तर भलतीच मोठी होती. विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात उड्या मारणारे बरेच नेते पाहायला मिळाली.
यंदाच्या निवडणुकीच्या या रणांगणात सर्वाधिक लक्ष लागून राहिलं आहे वरळी मतदारसंघाकडे. ठाकरे घराण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घरातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार जो व्यक्ती निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करतो त्या व्यक्तीने त्याच्याकडे असणारी संपत्ती, त्याच्यावर असणारे फौजदारी गुन्हे, स्थावर मालमत्ता, उत्पन्न अशाप्रकारे सर्वच माहिती अर्जासोबत द्यावी लागते. महाराष्ट्राच्या राजकारणात पवार आणि ठाकरे कुटुंब बहुचर्चित आहे. पवार कुटुंब निवडणुकीच्या आखाड्यात असल्यामुळे त्यांच्या संपत्तीची माहिती दर पाच वर्षाने मिळत असते. मात्र ठाकरेंकडे उत्पन्नाचं कोणतं स्त्रोत आहे याबाबत अनेकांनी प्रश्न विचारला आहे. आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने पहिल्यांदाच ठाकरेंच्या संपत्तीबाबत खुलासा होत आहे.
वरळी मतदारसंघातून निवडणूक लढविणारे आदित्य ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये आदित्यकडे एकूण ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती आहे. यामध्ये १० कोटी ३६ लाखांच्या बँक ठेवींचा समावेश आहे. आदित्य यांच्याकडे ६४ लाख ६५ हजार दागिने आणि २० लाख ३९ हजार रुपयांचे बॉन्ड्स आहेत. याशिवाय आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू कारदेखील आहे. या कारची किंमत ६ लाख ५० हजार असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
तसेच शिवसेना या पक्षाची ओळख आक्रमकरित्या आंदोलन करणारी संघटना म्हणून होती. अनेक आंदोलनाच्या माध्यमातून शिवसैनिकांवर गुन्हे नोंद आहे. राजकीय व्यक्तीवर कोणताही गुन्हा नोंद नाही असं किंबहुना कधी झालेलं ऐकण्यात आलं नाही. मात्र एकमेव आदित्य ठाकरे असे आहेत की त्यांच्यावर आजतागायत एकाही गुन्ह्याची नोंद नाही.
आदित्य ठाकरे यांच्या नावावर रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे 90 एकर जमीन आहे. कल्याण, आणि ठाण्यातील घोडबंदर येथे प्रत्येकी 1250 आणि 1508 स्व्केअर फूट व्यावसायिक प्लॅट आहे. मात्र आदित्य ठाकरेंवर एकाही बँकेचे कर्ज नाही. आदित्य ठाकरे हे उद्योग करतात. यातून त्यांना ही कमाई झाली आहे. आदित्य ठाकरेंनी 5 बँकेत आपले पैसे ठेवले आहेत. यातील एक बँक अशी आहे की, यात आदित्यने फक्त 276 रुपये ठेवले आहेत. भवानी सहकारी बँकेत आदित्यचे 276 रुपये आहेत. तर इंडियन ओवरसीज बँकेत 1 हजार रुपये ठेवले आहेत. सर्वाधिक पैसे एचडीएफसी बँकेत 5 कोटी 78 लाख 3 हजार 334 रुपये आहेत. त्यापाठोपाठ सारस्वत बँकेत 1 लाख रुपये, ICICI बँकेत 43 हजार 729 रुपये ठेवले आहेत. तसेच विविध कंपन्यांचे शेअर्स त्यांनी घेतलेले आहेत. यात चेन्नई पेट्रो, गायत्री प्रोजेक्ट लि., जिंदाल सॉ, टाटा मोटर्स, झेन टेक्नॉलॉजी, आयसीआयसीआय बँक, IDFC बँक यांचा समावेश आहे