मुंबईः शिवसेना-भाजपाला जनतेनं स्पष्ट बहुमत देऊन अद्यापही सरकार स्थापन करू शकलेले नाहीत. मुख्यमंत्रिपद आणि सत्तेच्या समसमान वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये ओढाताण सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनाकाँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली होती. जवळपास 10 मिनिटे या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. नेहमीप्रमाणे ही सदिच्छा भेट होती असं संजय राऊत यांनी सांगितले. त्यानंतर आता काँग्रेस नेते हुसेन दलवाई संजय राऊतांच्या भेटीसाठी सामनाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.हुसेन दलवाई सामना कार्यालयात संजय राऊतांच्या भेटीसाठी आल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच अनेक तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. काँग्रेसचा एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. सोमवारी शरद पवार यांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली. त्यावेळी पवारांनी राज्यातील परिस्थिती सोनिया गांधींना सांगितली. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल सोनिया यांनी फारशी अनुकूलता न दाखवल्याचं सूत्रांनी सांगितलं.काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यास महाराष्ट्रात भाजपा सत्तेपासून दूर होईल. मात्र याचे परिणाम राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला सहन करावे लागतील, अशी भूमिका सोनिया यांनी मांडल्याचं समजतं. त्यामुळे राऊत-शरद पवार यांच्या भेटीत पवारांनी विरोधी पक्षात बसण्याचं व्यक्त केलेले मतं शिवसेनेच्या प्रयत्नांना ब्रेक लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे
काँग्रेसने शिवसेनेसोबत जावं म्हणणारे हुसेन दलवाई 'सामना'च्या कार्यालयात; तर्कवितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 3:15 PM