मुंबई : ज्या महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार फडकला होता, तो महाराष्ट्र आता गलितगात्र झालाय. असा हतबल महाराष्ट्र मी पाहू शकत नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शूक्रवारी भांडुपच्या सभेत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
आमच्याकडे राम होता, त्यांच्याकडे रावण झाला, अशी टीका त्यांनी घाटकोपरच्या सभेत राम कदम यांच्यावर केली. यावळी त्यांनी मुंबईतील कंत्राटे, रस्त्यांची अवस्था, बुलेट ट्रेन, आरेतील वृक्षतोड आदी मुद्दयांचा उल्लेख केला. विरोधी पक्ष नसेल, तर हे सरकार वरवंटा फिरवेल. ईडीचे आरोप काँग्रेस- राष्ट्रवादीतील भ्रष्टाचारी भाजपमध्ये गेले. पण माझा आवाज दाबता येणार नाही. काँग्रेसचा विरोधी पक्षनेताच भाजपमध्ये गेल्याने सभागृहात जाऊन विरोध करण्यासाठी आम्हाला संधी द्या, या मागणीचा पुनरूच्चार त्यांनी केला.
नोटाबंदीवेळी आर्थिक मंदी येणार, असे मी सांगितले होते. उद्योगधंदे बंद पडत आहेत. नोकरीचे विमान २५ हजार फुटांवरून जाते आहे, हे मुद्दे त्यांनी मांडले. जीएसटी चुकीचा असल्याचे मतही त्यांनी मांडले. बुलेट टेÑनसाठी जायकाकडून १ लाख ७० हजार कोटीचे कर्ज काढण्यात आले. मग सरकारचे पैसे कुठे गेले. रिझर्व्ह बँकेकडून घेतलेला पैसा कुठे गेला, असे प्रश्न त्यांनी विचारले. गुजरातमध्येही बुलेट टेÑनला विरोध झाल्याचा दाखला त्यांनी दिला.
जनतेचा विसराळूपणा यांच्या पथ्यावर पडत आहे. भाजप-शिवसेनेने दिलेल्या जाहीरनाम्यापैकी किती कामे केली, त्यांच्या वचनांचे काय झाले? याबाबत कोणीही बोलत नाही. न केलेल्या कामाविषयी असलेला राग, चीड व्यक्त होत नाही. तुमच्याकडे मते मागायला येणाऱ्या उमेदवाराला जनतेने जाब विचारण्याची हीच संधी असल्याचे सांगत, त्यांनी सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. पाच वर्षांत १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण अमित शहा यांनी शेतकरी आत्महत्यांबाबत चकार शब्दही काढला नाही. शहा यांचे भाषण सुरू असताना आणखी एका शेतकºयाने आत्महत्या केली, हे सध्याचे वास्तव आहे, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.
मुंबई पालिका शाळेत शिक्षण घेणाºया मुलांना पालिकेत नोकरीची संधी मिळणार आहे. मात्र, महापालिकाच कर्जात बुडाली आहे. रस्त्यांचा प्रश्न कायम आहे, राज्यावर आणखी अडीच लाख रुपयांचा कर्ज आहे. त्यामुळे शेतकºयांचे नैराश्य वाढले आहे. मनसेने टोलमुक्त महाराष्ट्र करू, असे फक्त आश्वासन न देता ७८ टोल बंद केले. मोबाइल कंपन्यांत मराठीचा वापर सुरू झाला. त्यात चौथी भाषा आणली, तर परत बांबू बसतील, असाही इशारा राज यांनी दिला. रेल्वे स्टेशन, फुटपाथवर मनसेने आंदोलन करून मोकळे केले. त्यामुळे सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षात बसण्याची संधी द्या, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.