मुंबईः विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 14 दिवस उलटले तरी राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. शिवसेना आणि भाजपाला जनतेनं स्पष्ट बहुमत देऊनही दोन्ही पक्षांचं घोडं मुख्यमंत्रिपदावर अडलं आहे. भाजपा शिवसेनेला सत्ता वाटपात झुकतं माप द्यायला तयारी नाही, तर शिवसेनाही मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य राष्ट्रपती राजवटीकडे ढकललं जात आहे. अशातच संजय राऊत हे पत्रकार परिषद घेऊन भाजपावर कुरघोडी करत आहेत. संजय राऊतांनी आता पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्याचं सांगितलं आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शिवसेनेच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. सगळ्या आमदारांनी एकमुखानं उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सगळ्यांनाच मान्य असेल. महाराष्ट्रात जी अस्थिरता निर्माण होताना दिसतेय, ती अस्थिरता त्यांच्यामुळे निर्माण होतेय. महाराष्ट्रातील सगळ्या पक्षाच्या आमदारांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही भूमिका घेतलेली आहे. 24 तारखेला निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंची हीच भूमिका होती, ती आतासुद्धा आहे. मी माझ्याकडून युती तुटेल असं काहीही करणार नाही. युती तोडण्याचं पाप मी करणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक झाली. शिवसेना पक्षप्रमुखांनी पुन्हा एकदा आपली भूमिका आमदारांच्या समोर मांडली. सर्वच आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन दिलं. शिवसेनेच्या आमदारांना कुठेही दुसरीकडे हलवलेलं नाही. आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवल्याची चुकीची माहिती पसरवली जात असल्याचंही राऊत म्हणाले आहेत.
स्वतःही सरकार स्थापन करायचं नाही आणि घटनात्मक पेच निर्माण करायचे, हे आता चालणार नाही. राज्यघटना ही तुमची जहागीर नाही. कायदे के दायरे मे रहकर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. सरकार बनवण्यास असमर्थ आहोत, हे त्यांनी जाहीर करावं, मग शिवसेना पावलं उचलेल. महाराष्ट्राला लवकर एक चांगलं सरकार मिळेल. शिवसेना कधी आशेवर जगत नाही, आत्मविश्वासावर जगते. आमच्या आमदारांच्या निष्ठा आणि लोकांचा असलेला पाठिंबा यावर प्रवास करत राहू. मतदारांना शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे. आमचा मुख्यमंत्री कसा बनेल ते सभागृहात कळेल. संख्याबळ झालं आहे, ते सभागृहात दाखवू. आमच्याकडे पर्याय आहे, त्याशिवाय आम्ही बोलत नाही आहोत, असंही राऊत म्हणाले आहेत.
भाजपानं सरकार बनवण्यास असमर्थ असल्यास जाहीर करावं, मग आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. महायुतीला जनतेचा कौल मिळाला आहे, मग भाजपा सरकार स्थापन का करत नाही. महायुतीला कौल मिळाला असेल तर तो शिवसेना-भाजपाला एकत्रित मिळाला आहे. 2014ची परिस्थिती आणि 2019ची परिस्थिती वेगवेगळी आहे. आता धमक्या, पोलिसी बळाचा वापर चालणार आहे. आम्ही आता संयमाचं राजकारण करतो. साम-दाम-दंड-भेद जोपर्यंत खुर्ची आहे तोपर्यंत चालतो. हा सत्तेचा माज उतरल्यानंतर तो चालत नाही. भाजपा मुख्यमंत्री शिवसैनिक असल्याचं सांगत असल्यास मग अमित शाहा आणि मोदींनी आमच्या पक्षात प्रवेश करावा, असा टोलाही राऊतांनी हाणला आहे.