Maharashtra Election 2019: 'मुंबईत चौथी भाषा आणण्याचा प्रयत्न केला तर परत बांबू बसेल'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 07:48 PM2019-10-11T19:48:17+5:302019-10-11T19:50:03+5:30
सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत नाही. ज्यांनी बँका बुडवल्या ते मजेत आहे, ग्रामीण भागात शेतकरी आत्महत्या करतोय
मुंबई - आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करु असं आश्वासन दिलं होतं. महाराष्ट्र सैनिकांच्या आंदोलनामुळे 78 टोलनाके बंद झाले, आजही महाराष्ट्रात टोल सुरुच आहे. स्थानिक आमदार, खासदार यांना प्रश्न विचारत नाही. मोबाईल फोनवर हिंदी, इंग्रजी भाषा होती. मनसेच्या दणक्याने मराठीत आवाज ऐकू येऊ लागला. त्रिभाषा सूत्र असेल तर चालेल पण चौथी भाषा महाराष्ट्रात लादण्याचा प्रयत्न केला तर परत बांबू बसेल असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला आहे. राज ठाकरे यांची भांडुपमध्ये जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मतदानापर्यंत सर्व हुजरे तुम्हाला मुजरे करतात, अन् निवडून आल्यावर तुमच्याकडे 5 वर्ष बघतही नाही. निवडणुकीच्या वेळेला जाहिरनामा, वचननामा काढतात, 5 वर्षात काय झालं हे तुम्हीही विचारत नाही. महापालिकेतील शाळांमध्ये शिक्षण देणाऱ्यांना महापालिकेत नोकरी देणार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन खड्ड्यांचा प्रश्न निकाली काढणार अशी आश्वासनं दिली होती. पाच वर्षापूर्वी काय सांगितले आणि काय केले याचा विचार करा. आपल्याला व्यवस्थेविषयी राग का वाटत नाही? असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी व्यक्त केला.
त्रिभाषासूत्र ठीक आहे पण मुंबईत चौथी भाषा आणायचा प्रयत्न कराल तर बांबू बसेल #RajThackerayLive
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 11, 2019
तसेच सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत नाही. ज्यांनी बँका बुडवल्या ते मजेत आहे, ग्रामीण भागात शेतकरी आत्महत्या करतोय, पूल कोसळले माणसं मेली, या गोष्टींचा राग येत नाही, 5 वर्षापूर्वी यांनी काय सांगितले, किती गोष्टी केल्या याबाबत कोणीही विचारणा केली नाही. अमित शहांच्या संपूर्ण भाषणात शेतकरी आत्महत्येचा विषय नाही, कलम 370 फक्त तेवढचं बोललं जातं. अमित शहा भाषण करतानाचा बाजूच्या गावात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. 5 वर्षापूर्वी महाराष्ट्रावर साडेलाख कोटींचे कर्ज होतं. आता 4 वर्षात अडीच लाख कोटी कर्ज वाढलं असं राज ठाकरेंनी सांगितले.
दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे असं भाजपाने जाहिरनाम्यात लिहिलं होतं. या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या कशा वाढल्या? गेल्या 5 वर्षात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्रात रोजगार वाढतोय का? अवतीभोवतीचं वातावरण बघून गप्प बसून राहू नका, हीच ती वेळ आहे तुमचा राग व्यक्त करण्यासाठी निवडणुका आहेत. त्यामुळे सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेला संधी द्या असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जनतेला केलं.