मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेसाठीच्या वेगवान हालचाली राज्यात घडत आहे. दिल्लीत काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांची बैठक सोनिया गांधी यांच्या उपस्थित होत आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मुंबईतील ताज लँड या हॉटेलमध्ये महत्वपूर्ण बैठक झाली. जवळपास ४५ मिनिटे या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली आहे.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत राज्यात सरकार स्थापन करु शकतात यावर चर्चा झाली. किमान समान कार्यक्रम या मुद्द्यावरुन राज्यात महाशिवआघाडीचा प्रयोग होऊ शकतो यावर चाचपणी केली गेली. यामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येत सरकार स्थापन करु शकतो यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ४५ मिनिटांच्या या बैठकीनंतर शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे.
दुसरीकडे दिल्लीत सकाळी काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधी आणि अनेक काँग्रेसचे नेते उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील सत्तास्थापनेच्या तिढ्यावर चर्चा झाली. मात्र पुढील बैठक ४ वाजता पुन्हा राज्यातील नेत्यांसोबत होणार आहे. सोनिया गांधी राज्यातील नेत्यांसोबत चर्चा करुन अंतिम निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या पाठिंब्यावर राज्यात शिवसेना सरकारस्थापन करणार आहे. त्यामुळे राज्यातील या वेगवान घडामोडींमध्ये राज्यात नेमकं सरकार कोणाचं येणार यावर काही तासात चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, शिवसेनेचे मोदी सरकारमधील एकमेव मंत्री असलेल्या अरविंद सावंत यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे विश्वासार्हतेला तडा गेला आहे. आता राज्यात नव्या आघाडीसह शिवसेनेचे सरकार बनत आहे. अशा परिस्थितीत केंद्रात मंत्री म्हणून काम करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, असे अरविंद सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले. तसेच मी केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे युतीचे काय झाले आहे, ते तुम्ही समजून घ्या असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.