Maharashtra Election 2019: मुंबई व गुजरातचे जिव्हाळ्याचे आणि व्यापारी संबंध: विजय रुपाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 07:48 PM2019-10-15T19:48:44+5:302019-10-15T19:54:52+5:30
Maharashtra Election 2019: महाराष्ट्राचा व केंद्राचा विकास गतिमान होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असल्यास त्यांचा मोठा फायदा राज्याला व मुंबईच्या विकासाला होईल.
मुंबई: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई व गुजरातचे जिव्हाळ्याचे आणि व्यापारी संबंध आहे. तसेच वर्सोव्यातील तमाम जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुतीला मानणारी असल्याचे वक्तव्य गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केले आहे.
विजय रुपाणी म्हणाले की, महाराष्ट्राचा व केंद्राचा विकास गतिमान होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असल्यास त्यांचा मोठा फायदा राज्याला व मुंबईच्या विकासाला होईल. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार सतेवर येऊन पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील. गेल्या 5 वर्षात वर्सोव्याच्या विकासात आमदार लव्हेकर यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वर्सोवा विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती लव्हेकर यांच्या विरोधात उभ्या असलेल्या बंडखोर उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करा, त्यांची जागा त्यांना दाखवून द्या असे आवाहन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज दुपारी येथील गुजराती बांधवांना केले. लव्हेकर यांच्या प्रचारार्थ लोखंडवाला बँक रोडच्या सेलिब्रेशन क्लब मध्ये जाहिर सभा आयोजित केली होती.त्यावेळी ते बोलत होते.
गेल्या 55 वर्षात नेहरू ते डॉ.मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानाच्या कारकिर्दीत देशाचा विकास झाला नाही.काँग्रेसला जे जमले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 5 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत करून दाखवले.आज मोदी यांची जागतिक नेता म्हणून कीर्ती आहे.त्यांनी 370 कलम रद्द करून जम्मू-काश्मीरला खऱ्या अर्थाने स्वतंत्र केले,तलाक कलम रद्ध केले.राहुल गांधी तर एक गोंधळलेले व्यक्तिमत्व असून त्यांच्या मागे गोल गोल फिरणारे त्यांचे नेतेमंडळी असल्याची टीका यावेळी विजय रुपाणी यांनी केली.
गेली 5 वर्षे अनेक आमदार म्हणून अनेक विकासाची कामे करून येथील जनतेने जो विश्वास दाखवला, तसाच विश्वास त्यांनी पुन्हा दाखवून येथील जनतेने सेवा करण्याची संधी पुन्हा द्यावी अशी साद लव्हेकर यांनी घेतली. यावेळी राजकोटचे खासदार मोहनलाल कुंडारिया,भाजपच्या लिगल सेलचे अध्यक्ष अमित मेहता,नगरसेवक योगिराज दाभाडकर,नगरसेविका रंजना पाटील,वर्सोवा मंडल अध्यक्ष पंकज भावे आणि गुजराथी बांधव व नागरिक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.