Maharashtra Election 2019: जाणून घ्या,'अशा'प्रकारे शिवसेना देणार १० रुपयात भोजन थाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 10:09 AM2019-10-15T10:09:05+5:302019-10-15T10:11:41+5:30
Maharashtra Election 2019 : वचननामा जाहीर करण्यापूर्वी तज्ज्ञांशी आणि अर्थतज्ज्ञांशी बोलून १० रुपयाची भोजन थाळी देण्याचा निर्णय झाला आहे
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जनतेला विविध आश्वासन देत आहे. यातच सर्वाधिक चर्चा शिवसेनेने वचननाम्यात दिलेल्या १० रुपयांमध्ये जेवण या आश्वासनाची होत आहे. शिववडा १२ रुपयाला मिळत असताना १० रुपयात जेवण कसं देणार अशी टीका विरोधकांकडून शिवसेनेवर होत आहे. यावर शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी भाष्य केलं आहे.
सुभाष देसाईंनी सांगितले की, वचननामा जाहीर करण्यापूर्वी तज्ज्ञांशी आणि अर्थतज्ज्ञांशी बोलून १० रुपयाची भोजन थाळी देण्याचा निर्णय झाला आहे. मराठमोळ्या जेवणात १-२ चपाती, २-३ भाजी, वरण भात या एका थाळीचा खर्च ४० रुपये आहे. सरकारमध्ये आम्ही आल्यानंतर ही योजना लागू करु. यामध्ये १० रुपये ग्राहक देईल तर ३० रुपये सरकार अनुदान देईल. वर्षाकाळी १ हजार कोटी रुपये या योजनेला खर्च येईल. महाराष्ट्रात कोणीही उपाशी राहणार नाही अशी ही योजना आहे. वाढलेल्या उत्पन्नातून हा खर्च केला जाईल त्यासाठी वेगळा कर लादला जाणार नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा आहे. त्यामुळे अन्नावर सध्या आम्ही भर दिला आहे.
तसेच शिवसेनेच्या या योजनेवर टीका करताना शरद पवारांनी झुणका भाकर केंद्र उघडले, त्या जागा शिवसेनेने बळकावल्या असा आरोप केला त्यावर बोलताना सुभाष देसाई म्हणाले की, शरद पवारांनी केलेला आरोप बिनबुडाचे आहेत. झुणका भाकर केंद्राच्या जागा एवढ्या मोठ्या नाहीत. त्यांना जमिनी दिल्या नाही तर एनओसी दिल्या आहेत. जनतेचा पैसा हडप करणं हे काम राष्ट्रवादीचं आहे. त्यांचे मंत्री तुरुंगात गेलेले आहेत. राज्य सहकारी बँक, पेण अर्बन बँक या बुडविल्या कोणी? असा सवाल त्यांनी राष्ट्रवादीला केला आहे.
तर भाजपदेखील ५ रुपयात अटल आहार योजना सुरु करणार आहे त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना राज्य चालवायचं आहे की, स्वयंपाक करायचा आहे अशी टीका केली. त्यावरही स्वयंपाक करणारे दुसरे असतील आम्ही फक्त नियोजन करणार आहोत अशा शब्दात सुभाष देसाईंनी उत्तर दिलं आहे.