Maharashtra Election 2019 : पाचव्या माळेचा मुहूर्त साधत अनेक नेत्यांचे ‘शक्ति’प्रदर्शन, आज अंतिम दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 06:45 AM2019-10-04T06:45:01+5:302019-10-04T06:45:23+5:30
ललिता पंचमी आणि नवरात्र उत्सावातील पाचव्या माळेचा मुहुर्त साधत विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.
मुंबई : ललिता पंचमी आणि नवरात्र उत्सावातील पाचव्या माळेचा मुहुर्त साधत विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.
वरळीतून शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, परळीतून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कोथरुडमधून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तर जामनेर मतदारसंघातून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अर्ज दाखल केले.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता उद्याचा (शुक्रवार) एकच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे उर्वरित सर्व उमेदवार उद्या अर्ज दाखल करणार असल्याने रस्त्यांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ५ आॅक्टोबरला अर्जांची छाननी होणार असून ७ आॅक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येईल. ७ तारखेनंतरच लढतींचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
सर्वच प्रमुख पक्षांची अंतिम उमेदवार यादी जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे अनेकजण सध्या गॅसवर आहेत. तर निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून तयारी करीत असलेल्या इच्छुकांना ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरीचे अस्त्र उगारले आहे.
कोथरूड मतदारसंघात १०० टक्के ‘नोटा’?
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध म्हणून ‘१०० टक्के मतदान ‘नोटा’ कोथरूड मतदारसंघ’ असे फलक झळकविण्यात आले आहेत़ यापूर्वीही या मतदारसंघात ‘दूरचा नको घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे ’असे फलक झळकविण्यात आले होते़
लातूर जिल्ह्यात बंडखोरी अटळ
लातूर जिल्ह्यातील औसा, उदगीर आणि लातूर ग्रामीण या तीन विधानसभा मतदारसंघात भाजपा कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. लातूर ग्रामीणमधून रमेश कराड, उदगीरमधून आ़ सुधाकर भालेराव, अहमदपूर-दिलीपराव देशमुख, तर औसा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी आ़ दिनकर माने, भाजपातील बजरंग जाधव व किरण उटगे यांच्यापैकी एकजण रिंगणात राहणार आहे.
भाजपच्या तिसऱ्या यादीतही खडसे, तावडे, बावनकुळे नाहीत
भाजपच्या उमदेवारांची तिसरी यादी गुरुवारी जारी करण्यात आली. त्यातही माजी मंत्री एकनाथ खडसे, उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव नाही. हे तिघे तसेच माजी मंत्री प्रकाश मेहता (घाटकोपर), राज पुरोहित (कुलाबा) यांच्या उमेदवारीबाबतचा ‘सस्पेंस’ कायम आहे.
तिसºया यादीत राज्यमंत्री डॉ.परिणय फुके (साकोली), काशीराम पावरा (शिरपूर), डॉ.मल्लिकार्जून रेड्डी (रामटेक) आणि रमेशसिंह ठाकूर (मालाड पश्चिम) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. फुके हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असून विधान परिषदेचे सदस्य आहेत.
शिरपूरचे उमेदवार काशीराम पावरा यांनी चार दिवसांपूर्वीच काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले होते. ते माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते अमरिश पटेल यांचे निकटवर्ती आहेत.