Join us

Maharashtra Election 2019: माहिममध्ये मनसेच्या प्रचारासाठी उतरला मराठी 'Big Boss'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 2:28 PM

माहिम विधानसभा निवडणूक २०१९ - माहिम मतदारसंघात शिवसेनेचे सदा सरवणकर आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यभरात सुरु आहे, सर्वच उमेदवार प्रचारासाठी लागलेले आहेत. त्यातच रविवार या सुट्टीचा दिवस साधून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा मानस उमेदवारांनी केला. मुंबईत माहिम-दादर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो. २००९ चा अपवाद वगळता याठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत. मात्र या मराठी बहुल भागात मनसेचीही ताकद तेवढीच आहे. 

शिवसेना भवन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंज या मतदारसंघात येत असल्याने येथील लढत चुरशीसी होत असल्याचं पाहायला मिळतं. मनसे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचारासाठी मराठी कलाकार अभिनेत्री स्मिता तांबे, नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरे माहिमच्या गल्लोगल्ली फिरताना पाहायला मिळत आहे. ज्या मराठी माणसांसाठी मनसे नेहमी मदतीला येते आता आपण संदीप देशपांडे यांना निवडून द्यावं असं आवाहन शिव ठाकरे आणि अभिनेत्री स्मिता तांबे करताना पाहायला मिळत आहे.  

माहिम मतदारसंघात शिवसेनेचे सदा सरवणकर आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे नितीन सरदेसाई यांनी शिवसेनेचे आदेश बांदेकर यांचा पराभव करत माहिम विधानसभेवर मनसेचा झेंडा फडकविला. त्यावेळी काँग्रेसकडून लढलेले सदा सरवणकर यांनाही मोठ्या प्रमाणात मते पडली होती. मात्र कालांतराने सदा सरवणकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत सदा सरवणकर यांनी मनसेच्या नितीन सरदेसाई यांचा ६ हजार मतांनी पराभव केला होता. 

निवडणुकीच्या प्रचारात कलाकार मंडळी येण्याची ही पहिलीच वेळ नाही तर शिवसेनेकडून आदेश बांदेकर, दिगंबर नाईक, सुशांत शेलार हेदेखील पक्षाचा प्रचार करताना पाहायला मिळतात. नुकताच अभिनेत्री दीपाली सय्यद हिने शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेकडून दीपालीला मुंब्रा-कळवा या मतदारसंघाचं तिकीट मिळालं असून राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ती निवडणूक लढवित आहे. तर लोकसभा निवडणुकीतही अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेसमध्ये प्रवेश करुन उत्तर मुंबई लोकसभा निवडणूक लढविली होती.  

टॅग्स :मनसेसंदीप देशपांडेशिवसेनामाहीममहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019