- मनोहर कुंभेजकर
मुंबईः वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी घोषित केली आहे. दिवंगत बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांचे तिकीट कापणार असे समजल्यावर काल रात्री तृप्ती सावंत यांच्या समर्थकांनी मातोश्रीबाहेर शक्तिप्रदर्शन केले होते. मात्र मध्यरात्री उशिरा मतोश्रीने महापौरांच्या बाजूने कौल दिला. काल मध्यरात्री 3 वाजता विभागप्रमुख व आमदार ऍड. अनिल परब यांनी त्यांना एबी फॉर्म दिला असून, आज दुपारी ते शक्तिप्रदर्शन करत आपला निवडणूक अर्ज भरणार आहेत.दिवंगत आमदार प्रकाश सावंत यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत येथून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा दारुण पराभव केला होता. तृप्ती सावंत यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये नाराजी होती आणि जनसंपर्कात त्या कमी पडल्याची माहिती सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली.विश्वनाथ महाडेश्वर हे 1986 पासून शिवसेनेत सक्रिय असून, 1992 साली शाखाप्रमुख म्हणून त्यांची शिवसेनाप्रमुखांनी नियुक्ती केली. 3 वेळा नगरसेवक, 2012 ते 2017 मध्ये पत्नी पूजा महाडेश्वर या नगरसेविका होत्या. 2017 साली झालेल्या पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 86 मधून ते फक्त 34 मतांनी विजयी झाले. मात्र उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्यामुळे त्यांना 8 सप्टेंबर 2017 रोजी मुंबईचे महापौरपद मिळाले. आता राज्य सरकारने महापौरांना 3 महिन्यांची मुदतवाढ दिल्याने त्यांची 8 डिसेंबर 2019 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. सांताक्रूझ पूर्व येथील राजे संभाजी महाराज महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे ते संस्थापक आहेत.