मुंबई: आमच्याकडे असताना राम होता तिकडे गेल्यावर रावण झाला असल्याचं सांगत मनसेप्रमुख राज ठाकरेंनीभाजपाचे आमदार राम कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. घाटकोपमधील प्रचारसभेत राज ठाकरे बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर सर्व प्रसारमाध्यमांनी झोडपले होते. मात्र त्यानंतर देखील भाजपाकडूनराम कदम यांना पुन्हा उमेदवारीची तिकीट देण्यात आली. यावरुन भाजपाला सत्तेचा माज आला असल्याचं दिसून येतं असं सांगत राज ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे.
तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल, तर तिला पळवून आणण्यास मदत करू, असं वादग्रस्त विधान भाजपा आमदार राम कदम यांनी केलं आहे. मुलाला मुलगी पसंत असेल, त्याच्या आई-वडिलांनादेखील ती मुलगी पसंत असेल, तर चुकीचं असेल तरी आपण त्या मुलीला पळवून आणू, असं वादग्रस्त विधान राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात केलं होतं. या विधानानंतर विविध ठिकाणांहून निषेध करण्यात आला होता. यानंतर अखेर 47 तासांनी 'माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे' असं लिहित राम कदम यांनी ट्विटरद्वारे माफी मागितली होती.