मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा महायुती आणि महाआघाडीत सुरु असताना मनसेकडून राजकीय नाट्यावर प्रतिक्रिया आलेली आहे. मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज काय हे राज ठाकरेंनी सांगितलं होतं. आता तर सगळेच पक्ष विरोधी पक्षात बसायला तयार झालेत असा मार्मिक टोला मनसेने लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सक्षम विरोधी पक्षासाठी लोकांनी मतदान करावं. तुमचा राग व्यक्त करण्यासाठी सभागृहात माणसं हवीत असं सांगत पहिल्यांदाच राजकीय इतिहासात विरोधी पक्षात बसण्यासाठी मत देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र राज ठाकरेंच्या मनसेचा एकमेव आमदार निवडून दिला. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेचे राजू पाटील आमदार झाले. सत्तास्थापनेसाठी राज्यात महायुतीचं बिनसलं असल्याचं चित्र आहे.
मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आक्रमक झाल्याने भाजपाला सत्तास्थापन करता आली नाही. तर जनतेच्या आदेशाचा अनादर करुन शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार बनवू इच्छिते त्यांना शुभेच्छा आहेत असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे जर राज्यात महाशिवआघाडी असं नवीन समीकरण जुळून आलं तर राज्यात या तिन्ही पक्षाचं सरकार येईल तर भाजपा विरोधी बाकांवर बसेल असं वातावरण तयार झालं आहे.
मात्र अद्याप शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्यासाठी कौल दिला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत शिवसेना-भाजपाने एकत्र येऊन सरकार स्थापन करावं असं पवारांनी सांगितले होते. मात्र शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम राहिल्याने सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपाला सत्तास्थापन करता येत नाही. राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं मात्र बहुमताचा आकडा गाठू शकत नाही असं सांगत भाजपा सत्तास्थापन करणार नाही अशी असमर्थता भाजपा नेत्यांनी बोलून दाखविली आहे. त्यामुळे राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापन करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडीत कोणता पक्ष सत्तेत येणार याबाबत स्पष्टता नाही त्यामुळे या सर्व घडामोडींवर मनसेने मार्मिक भाष्य केलं आहे.