Join us

Maharashtra Election 2019 : अमित शहांची 'ती' कानउघाडणी अन् दिग्गज नेत्यांचा 'पत्ता कट'!

By यदू जोशी | Published: October 05, 2019 7:35 AM

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यांची तिकिटे का कापली गेली याची कारणे वेगवेगळी आहेत पण...

- यदु जोशीमुंबई : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यांची तिकिटे का कापली गेली याची कारणे वेगवेगळी आहेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या दरबारातच त्यांच्या नावावर फुली मारली गेली आणि त्यांच्या उमेदवारीचे दोर कापले गेले. अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली.फडणवीस मंत्रिमंडळ अस्तित्वात आले तेव्हा अमित शहा यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांची एक बैठक घेतली होती आणि बजावून सांगितले होते की, पक्ष चालवण्यासाठी सगळे काही करावेच लागते ही सबब सांगून कोणतेही चुकीचे काम तुम्ही करू नका. पक्ष कसा चालवायचा ते मी बघेन. शहा यांच्या त्या वाक्याचा संबंध राज्यातील दिग्गजांची तिकिटे कापण्याशी आता लावला जात आहे.बावनकुळेंना ‘ऊर्जा’ भोवली!ऊर्जा आणि उत्पादन शुल्क अशी दोन अत्यंत महत्त्वाची खाती सांभाळणारे बावनकुळे हे एकाचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोघांचेही निकटवर्तीय. मंत्री म्हणून त्यांच्या कामाचा झपाटा प्रचंड. इतके असूनही बावनकुळेंचे तिकीट कसे कापले गेले या बाबत प्रचंड औत्सुक्य आहे. असे म्हणतात की ऊर्जा विभागातील काही निर्णयांबद्दल ‘वर’नाराजी होती.भाजपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष असलेले केंद्रातील एक वजनदार मंत्री ज्यांनी काही काळ ऊर्जा खाते यशस्वीपणे सांभाळले त्यांना बावनकुळे यांचे काही निर्णय व त्या निर्णयांमधील बावनकुळेंची भूमिका खटकली. त्याबाबत तीव्र आक्षेप नोंदवत त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे नाराजी बोलून दाखवली होती. तेव्हापासून बावनकुळे दिल्लीच्या रडारवर होते.स्वत: गडकरी आणि मुख्यमंत्र्यांनी बावनकुळे यांना उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणून प्रतिष्ठा पणाला लावली पण पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी त्यास दाद दिली नाही. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास फडणवीस गडकरी यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून शहा यांना फोन लावला, पण त्यांना नकारच मिळाला.सरकारविरोधी वक्तव्य खडसेंच्या अंगलटएकनाथ खडसे हे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही सरकारविरोधात उघडपणे बोलत होते. हे सरकार नाकर्ते असल्याचा हल्लाबोल त्यांनी थेट विधानसभेत केला होता. ही टीकाच त्यांना भोवली. खडसे यांच्या बेलगाम वक्तव्याची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आणि त्यांना घरी पाठवले.‘शिक्षणा’मुळे तावडे नापास!विनोद तावडे यांच्याकडे शालेय शिक्षणमंत्रिपदही शेवटच्या तीन महिन्यांपर्यंत होते. राज्यातील शिक्षक संघटना अगदी भाजप समर्थित विधान परिषद सदस्यही त्यांच्यावर कमालीचे नाराज होते. संघ परिवारातील काही शिक्षण संस्थांनीही तोच सूर लावला. राज्यातील नेतृत्वास आव्हान देण्याची भाषा त्यांनी कधीही उघडपणे केली नाही पण तो त्यांचा नेहमीच छुपा अजेंडा असतो आणि त्यामुळे ते एक ना एक दिवस अडचणीत येतील, असे भाजपमधीलच काही नेते बोलायचे. शिक्षण विभागातील काही निर्णयांबाबत काही गंभीर आक्षेप दिल्लीपर्यंत पोचले होते, अशीही विश्वसनीय माहिती आहे.गृहनिर्माणात अडकले मेहता!सातवेळा आमदार राहिलेले प्रकाश मेहता हे गृहनिर्माण मंत्री असताना मुंबईतील एका गृहनिर्माण प्रकल्पातील कथित घोटाळ््यावरून वादग्रस्त ठरले. शेवटच्या टप्प्यात झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांचे मंत्रिपद गेले. याशिवायही काही गंभीर विषय होते. पुढे विधानसभेचे त्यांचे तिकिट कापले जाण्याची ती सुरुवात होती. किरीट सोमय्या यांच्याऐवजी मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईचे खासदार करून नवे गुजराती नेतृत्व समोर केले गेले. आता प्रकाश मेहतांना डावलून पराग शहांना उमेदवारी देत गुजराती समाजातील प्रस्थापित नेत्यांना बाजूला करून नव्यांना संधी देण्याचे वर्तुळ पूर्ण करण्यात आले.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019भाजपा