Join us

Maharashtra Election 2019: प्रचाराचा संडे फंडा; मुख्यमंत्र्यांसह भाजपा उमेदवारांनी केला मॉर्निंग वॉक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 8:11 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉक केला. त्यावेळी त्यांच्यासोबत कुलाबा विधानसभेचे उमेदवार राहुल नार्वेकरही उपस्थित होते.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला राज्यात रंग चढू लागला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी वेळ कमी उरल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचं काम प्रत्येक उमेदवार करताना दिसत आहे. यातच भाजपाने मुंबई चाले भाजपासोबत असं अभियान राबवून मुंबईकरांसोबत मॉर्निंग वॉक सुरु केलं आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉक केला. त्यावेळी त्यांच्यासोबत कुलाबा विधानसभेचे उमेदवार राहुल नार्वेकरही उपस्थित होते. तर मुंबईतील अन्य भागातही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मॉर्निंग वॉक करत लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनीही वांद्रे पश्चिम मतदारसंघात लोकांच्या भेटी घेतल्या. नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी चारकोप भागात मॉर्निंग वॉक केला तर कांदिवली पूर्व मतदारसंघात भाजपाचे अतुल भातखळकर यांनी मॉर्निंग वॉक करत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. 

निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारासाठी मिळणारा हा शेवटचा रविवार असल्यामुळे आज प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने प्रचारात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही मराठवाडा येथे 5 सभा होणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज साताऱ्यात, कोल्हापुरात सभा होणार आहेत. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही मुंबईतील चांदिवली, धारावी भागात दौऱ्यावर आहे. याठिकाणी राहुल गांधी यांची सभा होणार आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही मालाड, दहिसर भागात प्रचारसभा होणार आहेत. 

दरम्यान, शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा वचननामा जाहीर करण्यात आला. शिवसेनेच्या वचननाम्यात प्रामुख्याने शेतकरी, महिला आणि युवा वर्गांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. देशाला मंदीचा विळखा पडतोय, लोकांच्या रोजगाराचा प्रश्नही आहेच. त्यामुळे सरकारी तिजोरीचा विचार करूनच शिवसेनेने वचननामा तयार करण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दहा रूपयांत थाळीची योजना आहे. त्यासाठी राज्यात एक हजार ठिकाणी स्वस्त व सकस जेवणाची केंद्रे स्थापन करणार आहोत असं त्यांनी सांगितले.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019