मुंबई - विधानसभेसाठी भाजपाने संकल्पपत्र जाहीर केलं आहे. यामध्ये दळण-वळणाच्या आश्वासनात पुढील ५ वर्षात मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन सुरु करणार असल्याचं सांगितले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार हे काम करणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे कार्याध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थिती संकल्पपत्र जाहीर करण्यात आलं.
यामध्ये मुंबई-नागपूर, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-औरंगाबाद, मुंबई-पुणे आणि मुंबई नाशिक, मुंबई सावंतवाडी दरम्यान गतिमान असलेली वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरु करणार असल्याचं सांगितले. मुंबईतील लोकल रेल्वे वाहतुकीला प्रवास सुखकर होण्यासाठी विविध प्रकल्पांची पूर्तता करण्यात येणार आहे. तसेच मुंबई व परिसर, पुणे व नागपूर या नागरी समुहांमधील मेट्रो प्रकल्पांची कामे पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितले.
नाशिकमध्ये हायब्रीड मेट्रो, औरंगाबादमध्ये अत्याधुनिक Mass Rapid Transport Systym उभारणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याचसोबत मुंबई-नागपूर मालवाहतुकीसाठी फ्राईट कॉरिडॉरची निर्मिती करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. वर्धा-नांदेड व अहमदनगर-परळी-बीड रेल्वेमार्गाचे काम सुरु आहे. कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या कराड-चिपळूण रेल्वेमार्गाचे सर्व्हेक्षण सुरु झाले आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गाचे बुलेट ट्रेनचे काम सुरु झाले आहे अशी माहिती भाजपाकडून देण्यात आली आहे.
रेल्वेसोबतच रस्ते वाहतुकीमध्येही राज्यात ३० हजार किमी लांबीचे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला गती आली आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या रस्त्यांची दुरुस्ती करणार तसेच रस्त्यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणार असल्याची माहिती भाजपाकडून देण्यात आली आहे. ऐतिहासिक आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर पालखी मार्गाचे काम सुरु झालंय. प्रत्येक जिल्हा केंद्राचे शहर राष्ट्रीय महामार्गाने जोडण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.
तसेच आगामी काळात नागपूर-नांदेड-सोलापूर-कोल्हापूर-रत्नागिरी-सावंतवाडी असा सुपर हायवे तयार करुन पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाला राज्याच्या किनारपट्टीचा लाभ करुन देणार असल्याचीही घोषणा भाजपाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपाकडून आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे.