Maharashtra Election 2019 : मतदानासाठी मुंबई, ठाणे सज्ज; पालघर, रायगडमधील लढतींकडेही लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 03:59 AM2019-10-21T03:59:28+5:302019-10-21T06:38:56+5:30
Maharashtra Election 2019: विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील १८, पालघरमधील सहा, रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघांतील तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी आहे.
मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात ३३३, ठाणे जिल्ह्यात २१३, पालघरमध्ये ५३, तर रायगडमध्ये ७८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी मतदान केंद्रांची उभारणी, त्या मतदान केंद्रावर मतदानयंत्रे पोहोचविणे, आवश्यकतेनुसार सखी केंद्रे, दिव्यांगांसाठी- ज्येष्ठ नागरिकांसाठी सोय करण्यात आली आहे. सर्व मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
मुंबईतून अधिकाधिक आमदार निवडून आणण्याचा सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीसह काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचा प्रयत्न आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीतही मनसे आणि वंचित बहुजन आघाडीची चर्चा झाली. हे दोन्ही पक्ष विधानसभेत आपले खाते उघडतात का, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे; तर समाजवादी पार्टी आणि एमआयएमने आपल्या जागा राखण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.
काही अपवाद वगळता मुंबईतील बहुतांश जागांवर युती विरुद्ध आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. भायखळ्यात एमआयएम आणि अखिल भारतीय सेनेमुळे चौरंगी लढत आहे, तर माहीममध्ये शिवसेना आणि मनसेत प्रतिष्ठेची लढाई रंगली आहे. सत्ताधारी पक्षातील बंडखोरीमुळे वर्सोवा, वांद्रे पूर्व या मतदारसंघांमधील तिरंगी लढतीत विलक्षण चुरस आहे.
ठाणे, पालघर, रायगडमध्ये विविध ठिकाणी युतीतील धुसफूस सतत समोर येते आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि मीरा-भार्इंदरच्या लढती युतीतील बंडखोरीमुळे चर्चेत आहेत. कल्याण पश्चिमेत मनसे आव्हान राखते का, याकडेही लक्ष आहे. पालघर जिल्ह्यातही बोईसरमधील भाजपच्या बंडखोरीकडे लक्ष आहे. त्याचवेळी शिवसेना- बहुजन विकास आघाडीतील राजकीय संघर्ष रस्त्यावर आल्याने नालासोपाऱ्यातील लढतही अटीतटीची बनली आहे. रायगडमधील उरणची लढत बंडखोरीमुळे आणि त्याला पक्षाच्या नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे उघड झाल्याने गाजली.
मतदानकेंद्रात मोबाइल बंदी : मतदानकेंद्रात मोबाइल नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मतदारांनी शक्यतो मतदान केंद्रांवर मोबाइल आणू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. समजा आणला, तर मतदानावेळी तेथील निवडणूक कर्मचाऱ्यांकडे तो जमा करावा लागेल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
एसटीच्या १० हजार ५०० बस आरक्षित
राज्यातील विविध विभागांतील निवडणुकीच्या कामकाजासाठी एसटीच्या १० हजार ५०० बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. परिणामी राज्यभरातील विविध मार्गांवरील ५ हजार फेºया रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे दिवाळीसाठी बाहेरगावी जाणाºया प्रवाशांचे हाल होणार आहेत. एसटी महामंडळाने निवडणुकीच्या कामासाठी १० हजार ५०० एसटी बस दिल्याने शनिवारपासूनच एसटीच्या फेºया रद्द केल्या आहेत. त्यामुळे गावी जाणाºया व गावाहून येणाºया प्रवाशांना आरक्षण रद्द करावे लागले. या आरक्षणाच्या तिकिटाचे पैसे परत करण्यात आले आहेत.