Join us

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'प्रत्यक्ष निकालात राष्ट्रवादी पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकावर असणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 12:22 PM

निवडणुकीनंतर आता अनेकजण पुढे येऊन निवडणूक प्रक्रियेवर शंका व्यक्त करु लागले आहेत.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर विविध चॅनेल्सने दिलेल्या एक्झिट पोलची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. वृत्तवाहिन्यांच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा महायुती स्पष्ट बहुमतात निवडून येईल असं सांगितले आहे. तर विरोधकांना जेमतेम ५०-६० जागा मिळतील असं वर्तविण्यात आलं आहे. मात्र ओपनियन पोल असो वा एक्झिट पोल यामध्ये जाणीवपूर्वक एकच बाजू वरचढ दाखविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. 

याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे. शरद पवार व राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांच्या सभांना महाराष्ट्राने दिलेला प्रतिसाद पाहिला तर यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने महाराष्ट्राचा कौल आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

तसेच ओपनियन पोल असो वा एक्झिट पोल यामध्ये जाणीवपूर्वक पक्षाला कमी जागा दाखवून एकच बाजू वरचढ आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. असे पोल दाखवून लोकांच्या मनाची तयारी करण्याचे काम सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. हे सर्व पाहून 'डाल में कुछ तो काला है' असे वाटू लागते. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेवरच शंका निर्माण होते असंही जयंत पाटील यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, जनतेची शंकारहित निवडणूक व्हायला हवी. मात्र तसे सध्या होताना दिसत नाही. निवडणुकीनंतर आता अनेकजण पुढे येऊन निवडणूक प्रक्रियेवर शंका व्यक्त करु लागले आहेत. अशावेळी सत्तारुढ पक्षाने पुढे येऊन जनतेच्या शंकांचे निरसन करायला हवे. एखाद्या वरुन आलेल्या आदेशाप्रमाणे निवडणूक आयोगाची माणसे वागतात. जनतेच्या मनातील शंका दूर करण्याचे काम मात्र ते करत नाहीत असाही आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधारी भाजपा-शिवसेनेवर केला आहे. 

मात्र जर या सर्व बाबींचा निकाल लागला तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात निश्चित प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाचा पक्ष म्हणून जिंकून येईल याबाबत आमच्या मनात कोणताही संशय नाही असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे. 

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसभाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019एव्हीएम मशीन