मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचं चित्र आज स्पष्ट होण्याची चिन्हे आहे. भाजपा, शिवसेनापाठोपाठ राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपा यांच्यात तिढा निर्माण झाला. या दोन्ही पक्षाच्या भूमिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस लक्ष ठेवून होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्याने शरद पवार आज पत्ते उघडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
सोमवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली त्यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादी सत्तास्थापन करण्यास समर्थ आहे का हे सिद्ध करा, मंगळवारी रात्री ८.३० पर्यंत राष्ट्रवादीला मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आपले पत्ते योग्य वेळी उघडणार आहे. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनासोबत घेऊन राष्ट्रवादी राज्यात महाशिवआघाडीचा प्रयोग यशस्वी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
शिवसेनेने काल सत्तास्थापनेचा दावा केला असला तरी राज्यपालांनी हा दावा फेटाळला नाही. बहुमताचं पत्र मिळविण्यासाठी शिवसेनेला कसरत करावी लागत आहे. राज्यपालांनी शिवसेनेला वाढीव वेळ देण्याची मागणी नाकारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढचं पाऊल काय असेल? सत्तास्थापनेमध्ये राष्ट्रवादीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. राज्यात पर्यायी सरकार देण्याचा राष्ट्रवादीचा विचार आहे असं प्रवक्ते नवाब मलिक सांगतात. त्यामुळे राष्ट्रवादी शिवसेना, काँग्रेसला सोबत घेऊन राज्यात सत्तास्थापन करणार की नाही हे काही तासात स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, काँग्रेसचे शिष्टमंडळ अहमद पटेल, के.सी वेणुगोपळ, मल्लिकार्जुन खर्गे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये शिवसेनेला पाठिंबा तसेच राष्ट्रवादीला मिळालेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणावर निर्णय होण्याची शक्यता आहे. जर सरकार स्थापन करण्याची तयारी झाली तर यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असणार? सत्तेचा वाटा कसा घेणार? याची चर्चा बैठकीत होईल.
याबाबत बोलताना काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडे यांनी सांगितले की, सरकार बनविण्यापूर्वी आघाडीच्या नियम व अटींवर चर्चा होईल. नवीन सरकार स्थापन करण्याची अपेक्षा वाढली आहे. आम्हाला विश्वास आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार बनवू, शिवसेना प्रस्ताव आम्ही फेटाळून लावला नाही. त्यामुळे राज्यात महाशिवआघाडीचं सरकार बनविण्याची संधी अजूनही हातात आहे.
महत्वाच्या बातम्या
...म्हणून भाजपाने सरकार बनविण्यात असमर्थता दाखविली; अमित शहांच्या बैठकीत काय घडलं होतं?
...तर शिवसेना करणार भाजपाशी चर्चा; महायुतीच्या चर्चेची दारे उघडणार?
दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक, 'महाशिवआघाडी पे चर्चा'
महाराष्ट्राच्या राजकारणातील वेगवान घडामोडींचा दिवस
सत्तावाटपाचे सूत्र ठरल्यानंतरच आघाडीचा पाठिंबा मिळणार; काँग्रेस-राष्ट्रवादीची नवी खेळी