Maharashtra Election 2019 : मुद्दे बरोबरच; पण राज ठाकरेंची एक गोष्ट चुकलीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 01:26 AM2019-10-12T01:26:39+5:302019-10-12T01:26:52+5:30
विरोधी सदस्यांची संख्या किती आहे, यापेक्षा ते कशा पद्धतीने धारेवर धरतात, हे पाहायला मिळत असे.
- संजीव साबडे
देशात असा एक काळ होता की, काँग्रेस वगळता सारेच राजकीय पक्ष अतिशय दुर्बळ होते. त्यांना स्वत:ची ताकद माहीत होती. त्यामुळे ते सर्व मतदारसंघांमध्ये उमेदवारही उभे करीत नसत. या पक्षांची काही पॉकेट्स होती आणि तिथेच ते पक्ष आपली ताकद लावत. त्यामुळे त्यांच्या निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्याही मर्यादित असे. आपण सत्तेत येणार नाही, पण विरोधी पक्ष म्हणून सरकारवर अंकूश हवा, असा त्यांचा आग्रह असायचा. त्यातून महाराष्ट्र विधानसभेत शेकाप, समाजवादी पक्ष (तेव्हाचा, आताचा नव्हे), दोन्ही कम्युनिस्ट, जनसंघ आदींचे हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच उमेदवार निवडून येत. तरीही ते सरकारला विधानसभेत अनेक मुद्द्यांवर सळो की पळो करून सोडत.
विरोधी सदस्यांची संख्या किती आहे, यापेक्षा ते कशा पद्धतीने धारेवर धरतात, हे पाहायला मिळत असे. शिवाय आजच्यासारखे सभागृहात केवळ गोंधळ घालून ते कामकाज बंद पाडत नसत. सरकारकडून उत्तरे घेत आणि अनेकदा त्यांच्या कार्यपद्धतीमुळे सरकारला आपले निर्णयही बदलायला लागत. शिवाय रस्त्यावर त्यांची मोठी आंदोलने होत. त्यामुळे सरकारइतकाच विरोधी पक्षही खमका असावा लागतो, त्याचे महत्त्वही संसदीय लोकशाहीत सरकारइतकेच महत्त्वाचे आहे, असे जाणवत असे. पुढे १९७९ मध्ये देशात व अनेक राज्यांत काँग्रेस पराभूत झाली आणि तेव्हाच्या विरोधी पक्षांच्या विलिनीकरणातून स्थापन झालेला जनता पक्ष सत्तेत आला. तेव्हापासून सर्वच पक्षांना आपण सत्तेतच असायला हवे, असे वाटू लागले. त्यासाठी कोणीही कोणाशीही आघाड्या, समझोता करू लागले आणि विरोधी राजकारणाचे महत्त्व कमी झाले.
या साºयाची आठवण आता येण्याचे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर सभांतून आम्हाला विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या, असे आवाहन केले. सत्ता आवाक्यात असेल, तेव्हाच सत्तेसाठी आपण मते मागू, आम्हाला आमचा आवाका माहीत आहे. त्यामुळे प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आम्हाला मतदान करा, असे तेही म्हणाले. एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रमुखाने आम्हाला विरोधी बाकांवर बसण्यासाठी निवडून द्या, असे आवाहन करणे आताच्या काळात आश्चर्याचे वाटेल. मनसेची किती ताकद आहे आणि त्यांचे किती उमेदवार निवडून येतील, ही बाब अलाहिदा, पण राज्यात भक्कम व प्रबळ विरोधी पक्षाची गरज असल्याचे राज ठाकरे यांच्या भाषणातून अधारेखित झाले, हे महत्त्वाचे.
आपणच कसे प्रबळ विरोधी पक्ष बनू शकतो, हे सांगताना, त्यांनी एक विरोधी पक्षनेताच (राधाकृष्ण विखे-पाटील) कसा सत्ताधारी पक्षात गेला, हेही आवर्जून सांगितले. म्हणजेच आताच्या विधानसभेत असलेले विरोधी सदस्यही मध्येच उठून सत्तेकडे धाव घेऊ शकतात, हे त्यांना सांगायचे असावे. काँग्रेस व राष्ट्रवादीपेक्षा आम्ही वेगळे आहोत, हे दाखवून देण्याचा राज ठाकरे यांचा सध्या प्रयत्न दिसतो. अगदी आतापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याशी सलगी करू पाहणाºया राज ठाकरे यांनी त्यांच्याऐवजी आपल्यालाच प्रमुख, प्रबळ विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळावे, असा त्यांचा प्रयत्न आहे. एका अर्थाने विरोधी पक्षात राहण्याची तयारी ठेवण्याच्या त्यांच्या भूमिकेचे स्वागतच करायला हवे.
पण राज ठाकरे यांनी यंदा आपले उमेदवार फारच विलंबाने घोषित केले. त्याआधी त्यांचा पक्ष निवडणूक लढवणार की नाही, हेच स्पष्ट नव्हते. बहुधा कार्यकर्त्यांच्या दबावामुळेच त्यांनी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला, असे वाटत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी भागाभागांत फिरून सभा, मेळावे सुरू केल्या तरी राज ठाकरे आणि त्यांचे नेत्यांना मनसेची भूमिका काय असावी, हे ठरवता आले नव्हते. राज ठाकरे नेहमीच शेवटच्या क्षणी मैदानात उतरले. ते आधी उतरले, तर राजकारणात रंगत आली असती आणि कदाचित त्यांच्या या आवाहनाचा उपयोगही झाला असता. त्यांनी खरे तर महाराष्ट्र पिंजून काढायला हवा होता. पण त्यात ते मागे पडले असे मनसेचे कार्यकर्तेच सांगताना दिसतात.
एक मात्र खरे की, राज ठाकरे यांनी आता भूमिपुत्र, हिंदुत्ववाद, मराठी विरुद्ध अमराठी हे भावनिक प्रश्न बाजूला ठेवून आर्थिक मुद्यांना हात घालण्याचे ठरविले आहे. ते आता बेरोजगारीचा प्रश्न, लोकांच्या नोकºया जाणे, बँका बुडणे, उद्योगधंदे बंद होणे आदी प्रश्न उपस्थित करीत आहेत. पुण्यातील पुराच्या निमित्ताने नागरी प्रश्न उपस्थित करू लागले आहेत, वृक्षतोडीमुळे निर्माण होणारा पर्यावरणाचा मुद्दा ते सभांमधून मांडत आहेत. शेतकरी, तरुण, महिला, विद्यार्थी यांच्या प्रश्नांनाही त्यांनी गुरुवारच्या सभांतून हात घातला आहे.
काश्मीरच्या व ३७0 कलम रद्द केल्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लढवू पाहणाºया सत्ताधारी पक्षांवर ते तुटून पडले. त्यांच्या मुंबईतील भाषणांना चांगला प्रतिसादही मिळाला. ते उत्तम वक्ते आहेत, त्यांच्या अनुयायांची संख्या प्रचंड आहे. पण मनसे स्थापन झाल्यानंतरच्या एकाच विधानसभा निवडणुकीत त्यांच्या अधिक जागा आल्या होत्या. ते नंतर का जमले नाही, याचे चिंतन त्यांच्या पक्षाने किमान निवडणुका संपल्यानंतर तरी करायला हवे.