आमदारकीचं स्वप्न भंगलेल्या पंकजा मुंडे भाजपा आमदारांच्या बैठकीला जातात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 04:06 PM2019-10-30T16:06:39+5:302019-10-30T16:08:09+5:30
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात बाजी मारली आणि 'टीम देवेंद्र'मधील तडफदार मंत्री पंकजाताईंना आमदारकी गमवावी लागली.
सातारा लोकसभा मतदारसंघातील उदयनराजे भोसलेंचा पराभव आणि परळी विधानसभा मतदारसंघातील पंकजा मुंडेंचा पराभव धक्कादायक आणि दुःखदायक असल्याची भावना भाजपाच्या अनेक नेत्यांनी निकालानंतर व्यक्त केलीय. भावा-बहिणीच्या भावनिक राजकारणात धनु'भाऊ' - अर्थात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी बाजी मारली आणि 'टीम देवेंद्र'मधील तडफदार मंत्री पंकजाताईंना आमदारकी गमवावी लागली. असं असतानाही, भाजपा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी झालेल्या आमदारांच्या बैठकीला पंकजा मुंडे उपस्थित राहिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील हे प्रश्नचिन्ह पाहून स्वतः पंकजा यांनीच या संदर्भात खुलासा केला.
मी आमदार म्हणून निवडून आले नसले, तरी भाजपाच्या कोअर कमिटीची सदस्य या नात्याने आजच्या बैठकीला उपस्थित आहे, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर, सर्व आमदार आणि नेत्यांसह त्या भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतानिवडीच्या बैठकीत उपस्थित होत्या. व्यासपीठावर त्यांना स्थान देण्यात आलं होतं. परंतु, आमदार म्हणून या बैठकीला हजर राहता न आल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होतं.
भाजपा आणि शिवसेनेचं बिनसलं आहे, पण...; रामदास आठवलेंचा दोघांना मोलाचा सल्ला
पावसाचा आनंद मातीशी संबंध असणाऱ्यांना होतो; श्रीनिवास पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
सत्तास्थापनेबाबतच्या प्रश्नांना पंकजा मुंडे यांनी मोघम उत्तरं दिली. पुढच्या दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'फिर एक बार...'
दरम्यान, भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी निवडणुकीआधीच, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आज, प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकात पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि राधाकृष्ण विखे-पाटील, हरिभाऊ बागडे, सुधीर मुनगंटीवार, शिवेंद्रराजे भोसले, देवयानी फरांदे, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, आशीष शेलार, संजय कुटे, गणेश नाईक यांनी त्याला अनुमोदन दिलं.
मा मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis यांची भाजपा महाराष्ट्र विधीमंडळाच्या नेतेपदी एकमताने निवड.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 30, 2019
खूप खूप अभिनंदन!!
शरद पवारांच्या भेटीनंतर आर. आर. पाटलांचे सुपुत्र रोहित म्हणाले....
संदीप देशपांडे शरद पवारांच्या भेटीला; राज ठाकरेंसोबतही करणार चर्चा
शिवसेनेला नवा फॉर्म्युला
भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवून बहुमत मिळवलं असलं, तरी 'फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्युल्यावरून त्यांच्यात खटका उडाला आहे आणि सत्तास्थापनेचं घोडं अडलं आहे. मुख्यमंत्रिपद देणार नाही, असं भाजपानं स्पष्टच सांगितलंय आणि उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारीही दाखवली आहे. १३ मंत्रिपदं तुम्हाला, २६ आम्हाला, असा नवा फॉर्म्युला त्यांनी सेना पक्षश्रेष्ठींपुढे ठेवल्याचं कळतं.