Maharashtra Election 2019 : भाऊंपेक्षा ताईच श्रीमंत, तरीही पंकजा मुंडेंकडे एकही वाहन नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 08:53 PM2019-10-04T20:53:24+5:302019-10-04T21:26:23+5:30
Maharashtra Election 2019 :पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या संपत्तीची तुलना केल्यास पंकजा यांनी बाजी मारली आहे.
परळी विधानसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार महिला व बाल विकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ना. पंकजाताई मुंडे यांचे यशश्री निवासस्थानी त्यांच्या आई प्रज्ञाताई मुंडे यांनी त्यांचे औक्षण करून आशीर्वाद दिले. तर, धनंजय मुंडेंनीही गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोठ्या शक्तिप्रदर्शनात मुंडेंनी आपला अर्ज भरला. ताई आणि भाऊंनी आपल्या अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचं विवरण करण्यात आलं आहे.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या संपत्तीची तुलना केल्यास पंकजा यांनी बाजी मारली आहे. पंकजा यांची संपत्ती धनंजय मुंडेंपेक्षा अधिक आहे. पंकजा मुंडे यांनी शपथपत्रात नमूद केलेली एकूण संपत्ती 5 कोटी 54 लाख 54 हजार 72 रुपये असून धनंजय मुंडे यांची संपत्ती 3 कोटी 65 लाख 61 हजार 244 रुपये इतकी असल्याचं नमूद करण्यात आलंय.
पंकजा मुंडेंची संपत्ती
पंकजा मुंडे यांच्याकडे एकही वाहन स्वतःच्या नावावर नाही तर 450 ग्राम सोने आणि 4 किलो चांदी असून दीड लाख रुपयांचे दागिने असल्याचं नमुद केलंय. त्यांचे पती चारुदत्त पालवे यांच्याकडे 14 कोटी 33 लाख 55 हजार 429 रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याकडे 25 लाख 40 हजार रुपयांची एक BMW गाडी आहे. पंकजा मुंडे यांनी शेअर्स मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध एकही प्रलंबित खटला किंवा गुन्हा दाखल झालेला नाही.
धनंजय मुंडेंची संपत्ती
धनंजय मुंडे यांच्यावर विविध आंदोलने तसेच संत जगमित्र साखर कारखाना अशा प्रकरणातील नऊ गुन्हे दाखल असून त्यांच्या नावावर दोन ट्रॅक्टर आणि दोन चारचाकी वाहने आहेत. शेअर्स आणि शेतीमध्ये धनंजय मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. त्यांच्या नावावर 3 कोटी 65 लाख 61हजार 244 रुपये जंगम तर 1कोटी 14 लाख 90 हजार 522 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्याकडे 2 कोटी 20 लाख 90 हजार 964 रुपयांची जंगम आणि 25 लाख 14 हजार 635 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
दरम्यान, महाजनादेश यात्रेच्या समारोपावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शरद पवारांना आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमधून राजकारणाला सुरुवात केली. बीड जिल्ह्यातले उमेदवार घोषित केले. मात्र, खुद्द शरद पवार स्वत: बीडमधून उभे राहिले तरी कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी शरद पवारांवर टीका केली होती. तर, धनंजय मुंडेंविरुद्धची लढत मला आव्हान वाटत नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.