मुंबई: प्लॅस्टिक पर्यावरणासाठी घातक असून त्याच्याऐवजी अधिकाधिक कापडी पिशव्यांचा वापर करावा आणि प्रदूषणविरहित पर्यावरणाला हातभार लावावा, असा संदेश सखी मतदान केंद्रातून देण्यात आला. दहिसर, बोरीवली, मागाठाणे मतदारसंघातील महिलांसाठी उभारलेल्या सखी केंद्रांमध्ये मतदान करण्यासाठी आलेल्या महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देण्यात आला. मुख्य म्हणजे या कोकम सरबत, कापडी पिशव्यांची जबाबदारी पूर्णपणे महिला बचतगटांवर सोपवण्यात आली होती. या बचतगटांकडून कोकम सरबत आणि कापडी पिशव्यांचा पुरवठा केला गेला.
निवडणुकीत सखी, अर्थात महिलांचे, महिलांसाठी आणि महिलांनी चालवलेले मतदान केंद्र ही संकल्पना चांगलीच रुजली आहे. बोरीवली राजदा म्युनिसिपल हायस्कूलमधील सखी मतदान केंद्रातही पाच अधिकारी, कर्मचारी अशी चमू तैनात होती. त्यानुसार, सखी मतदान केंद्रात नियुक्त केलेल्या चमूमध्ये महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, साहाय्यक, कर्मचारी यांचा समावेश असून पोलीस कर्मचारीही महिलाच होत्या. सखी मतदान केंद्रांची वेगळी संकल्पना पाहून अधिकाधिक महिला मतदानासाठी येत असल्याचे तेथील अधिकाºयानी आवर्जून सांगितले.
मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी मुलांसोबत येणाºया महिला मतदारांना सुविधा देण्यासाठी पाळणाघराची व्यवस्था पुरविली गेली होती. या पाळणाघरात नोंदवही ठेवण्यात आली होती आणि त्यात पाळणाघरात ठेवणाºया मुलांची अंगणवाडी सेविकांकडून नोंद केली जात होती.