Maharashtra Election 2019: महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य नऊ कोटी मतदारांच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 03:25 AM2019-10-21T03:25:54+5:302019-10-21T06:38:38+5:30
Maharashtra Election 2019: विधानसभा निवडणुक : सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यत वेळ
मुंबई: महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या १३व्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी, २१ ऑक्टोबर रोजी मतदान होत असून, सुमारे ९ कोटी मतदार या निवडणुकीत उतरलेल्या ३,२३७ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत.
महिनाभर सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीची शनिवारी सांयकाळी सांगता झाली. गेल्या ४८ तासांत वैयक्तिक भेटी-गाठी व इतर संपर्क साधनांच्या माध्यमांतून मतांची बेगमी करण्यावर उमेदवारांनी भर दिला. काही ठिकाणी पैसेवाटपावरून उमेदवारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडले.
निवडणूक आयोगाने मतदानासाठी जय्यत तयारी केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून निवडणूक आयोगाने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
त्यानुसार, खास महिला कर्मचारी तैनात असलेली ३७२ सखी मतदान केंद्र उभी केली आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडावी, यासाठी आयोगाने केंद्रीय, तसेच राज्य राखीव दलाची मदत घेतली असून, राज्य पोलीस दलातील सुमारे ४० हजार कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तावर असतील. मतदान केंद्राचा परिसर आणि स्ट्राँगरूमच्या बाहेर चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अचानक उद्भवलेला प्रसंग निस्तारण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्स तयार ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्राच्या परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे, तसेच केंद्राच्या आतमध्ये मोबाइल नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
इंटरनेट बंद ठेवा
मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येक मतदान केंद्र (पोलिंग बुथ) आणि मतदान यंत्रे (ईव्हीएम) ठेवलेल्या स्ट्राँग रूमच्या ३ कि.मी. परिसरातील इंटरनेट सेवा बंद ठेवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
पोस्टल मतदान करतानाचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे युनियन बँकेच्या पंढरपूर शाखेतील अधिकारी संतोष छबुराव खंडागळे (रा.लोणीव्यंकनाथ, ता.श्रीगोंदा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतदारांना विविध ऑफर्स
मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोग आणि काही सेवाभावी संस्था प्रयत्न करीत असताना, आता व्यावसायिकदेखील त्यासाठी सरसावले आहेत. मतदान करून आल्यानंतर संबंधितास विविध प्रकारच्या सवलती देण्याच्या योजना जाहीर केल्या आहेत. काही ठिकाणी दाढी-कटिंगवर ५० टक्के सूट देण्यात आली आहे, तर काही हॉटेल चालकांनी स्वस्तात चहा-नाश्ता आणि जेवणाचीही सोय केली आहे.
288- जागा
3,237 - उमेदवार
3,001- पुरुष
235- महिला
01- तृतीयपंथी
२१ लाख मतदार वाढले
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये २१,१५,५७५ एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण ८,७३,३०,४८४ मतदार होते. ३१ ऑगस्टपर्यंत ८,९४,४६,२११ एवढी मतदार नोंदणी झाली आहे.
8,98,39,600- मतदार
4,68,75,750- पुरुष
4,28,43,635- महिला
3,96,000- दिव्यांग
1,17,581- सर्व्हिस मतदार
2,634- तृतीयपंथी
प्रचारासाठी कोणाच्या किती सभा झाल्या?
भाजप :
नरेंद्र मोदी ९
अमित शहा १०
देवेंद्र फडणवीस ६५
नितीन गडकरी ३५
जे. पी. नड्डा ७
योगी आदित्यनाथ १०
पंकजा मुंडे १८
शिवसेना :
उद्धव ठाकरे ५०
आदित्य ठाकरे २२
मनसे :
राज ठाकरे २०
वंचित :
प्रकाश आंबेडकर ७०
काँग्रेस :
राहुल गांधी ५
ज्योतिरादित्य शिंदे ५
मल्लिकार्जुन खरगे ११
भूपेश बघेल १३
बाळासाहेब थोरात ५४
अशोक चव्हाण १६
शत्रुघ्न सिन्हा ७
राष्ट्रवादी :
शरद पवार ६०
जयंत पाटील ६५
छगन भुजबळ ४८
अमोल कोल्हे ६५
धनंजय मुंडे ३८
सुनील तटकरे १२
सुप्रिया सुळे १२