मुंबई : भाजप-शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असून महायुतीचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याचवेळी ‘अब की बार २२० के पार’च्या महासंकल्पाला मतदारांनी रोखले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकांड्या शिलेदाराप्रमाणे ही निवडणूक लढवून आपल्या पक्षाला भाजप-सेनेपाठोपाठ सर्वाधिक जागा मिळवून दिल्या.
काँग्रेसने आधीच्या जागांमध्ये वाढ करीत महायुतीला धक्का दिला आहे. निकालानंतर भाजप-शिवसेनेने सत्ता स्थापण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून या बाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी फोनवर चर्चा केली. जवळपास १५ बंडखोर/अपक्ष आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सत्तास्थापनेची जोरदार तयारी सुरू केल्याचे स्पष्ट केले. सत्तेसाठी आम्ही काहीही वेडंवाकडं करणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची शक्यता फेटाळली असून महायुतीचेच सरकार येणार असे स्पष्ट संकेत दिले. त्याचवेळी सत्तेत ‘फिप्टी-फिप्टी’चा वाटा राहील, अशी भूमिका घेत भाजपवर दबावही आणला आहे. ‘दुसरे, तिसरे काहीही घडणार नाही, महायुतीचीच सत्ता येणार’ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर, अहमदनगर, पालघर, पुणे, लातूर, बीड, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीने युतीला धक्के दिले. युतीला विदर्भाखालोखाल प. महाराष्ट्रात तडाखा बसला. गेल्या वेळी भाजप, शिवसेनेच्या पारड्यात ४८ जागा टाकणाऱ्या विदर्भाने यंदा अपेक्षाभंग केला. प. महाराष्ट्रात राष्ट्रवादीने मुसंडी मारली. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने जागांची पन्नाशी पार केली पण काँग्रेसने ५० जागा जिंकल्या हे मोठे यश आहे.
लोकसभेपूर्वी जे ठरले ते भाजपलादेखील माहिती आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक तो कौल राज्यातील जनतेने महायुतीला दिलेला आहे. हा जनादेश सर्वच पक्षांचे डोळे उघडणाराच नाही तर डोळ्यात अंजन घालणारा आहे. सगळ्यांना जमिनीवर आणणारा आहे. यापुढे अत्यंत जबाबदारीने सत्ताधाऱ्यांना काम करावे लागेल, जनतेसमोर नतमस्तक होऊन काम करावे लागेल.- उद्धव ठाकरे, शिवसेना
तुम्ही काळजी करू नका. दुसरं काही होणार नाही. राज्यात महायुतीचीच सत्ता येणार आहे. माझं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं बोलणं झालेलं आहे, आमचं ठरलंय त्यानुसारच सगळं होईल. काय ठरलंय ते तुम्हाला योग्य वेळी कळेल. साताºयामध्ये छत्रपती उदयनराजे आणि परळीतील पंकजा मुंडे यांचा पराभव आमच्यासाठी धक्कादायकच आहे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री