Join us

Maharashtra Election 2019: रस्त्याबरोबरच सोशल मीडियावर प्रचाराची धूम; ‘ऑन लाईन’ची भिस्त खासगी कंपनीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 9:16 PM

सोशल मीडियाच्या प्रचारासाठी अद्यावत ‘वॉर रुम’ उभ्या केल्या आहेत. त्याची जबाबदारी खासगी कंप न्यांकडे सोपविली असून त्यावर समन्वयासाठी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे.

मुंबई : विधानसभा निवडणूकीला मतदानासाठी अवघ्या दहा दिवसाचा अवधी उरला असताना  उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचाराची राळ उडवित आहेत. रॅली, कॉर्नर सभा व पदयात्राबरोबरच  सोशल मीडियावरुन प्रचारावर भर दिला जात आहे. मानखुर्द-शिवाजीनगर, अनुशक्तीनगर, घाटकोपर (पू) मतदारसंघात सर्वच प्रमुख उमेदवारांनी त्यासाठी स्वतंत्र सोशल वॉर रुम’ कार्यान्वित केली आहे.

सोशल मीडियाच्या प्रचारासाठी अद्यावत ‘वॉर रुम’ उभ्या केल्या आहेत. त्याची जबाबदारी खासगी कंप न्यांकडे सोपविली असून त्यावर समन्वयासाठी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे.मतदारसंघातील मतदारांची नावे, त्यांचे व्हॉटसअप नंबर, सोशल अकांऊटवर संपर्क साधला जात आहे. त्यांच्याबरोबर विविध ग्रुपवर आपल्या उमेदवाराच्या प्रचार व माहिती पाठविली जात आहे. अनुशक्तीनगर मतदार संघात मुख्य लढत शिवसेनेचे विद्यमान आमदार तुकाराम काते व  मुंबई राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्यात होत आहे. त्याचबरोबर मनसेचे विजय रावराणे रिंगणात आहेत. या तिघांनी आपल्या प्रचार कार्यालयात स्वतंत्रपणे ‘वॉर रुम’ उभारली आहे. त्याद्वारे मतदारांशी संपर्क साधले जात आहेत.  उमेदवाराच्या नावे फेसबुक, इन्ट्राग्राम, ट्विटर आदी अकांऊट उघडण्यात आलेले आहेत. त्यावर त्यांचे छायचित्रे, कार्याच्या माहितीबरोबरच  त्याचबरोबर उमेदवारांच्या नियोजित प्रचार दौरे, नेत्यांच्या सभा, रॅलीची माहिती देण्यात येत आहे.

मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सपा व कॉँग्रेसचे आघाडीचे उमेदवार अबू आझमी यांनी गोवंडीतील प्रचार कार्यालयात सोशल वॉर रुम बनविली आहे. तर त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांनी सोशल मीडियासाठी स्वतंत्र टीम बनविलेली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. 

भाजपातील अतर्गंत वादामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या घाटकोपर (पू) मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पराग शाह यांनी सोशल मीडियावरील प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. मनसेचे सतीश पवार, कॉँग्रेसचे उमेदवार मनिषा सुर्यवंशी , वंचित बहुजन आघाडीचे दीपक पवार यांनीही पदयात्रा,कॉर्नर सभाबरोबरच सोशल मीडियावर प्रचारासाठी   स्वतंत्र वॉर रुम बनविली आहे. त्याठिकाणी प्रशिक्षित युवकांना तैनात करण्यात आले आहे. 

टॅग्स :सोशल मीडियाराजकारण