मुंबई : विधानसभेच्या ३६ जागांसाठी सोमवारी मुंबईकर मतदान करणार असले तरी सर्वसामान्य मुंबईकरांना भेडसावणाºया मुद्द्यांशिवायच प्रचाराचा गोंगाट शांत झाला. मुंबईकरांच्या समस्यांना प्रचाराचा मुख्य मुद्दा बनविण्यात विरोधी पक्षांना अपयश आले. सत्ताधाऱ्यांनीही या प्रश्नावर पठडीतील नेहमीची भूमिका मांडत वेळ मारून नेली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पावसाच्या हजेरीमुळे उमेदवारांची तारांबळ उडाली. या पावसातच यंदाच्या निवडणुकींच्या प्रचार तोफा थंडावल्या.
मुंबईतील खड्डे, वाहतूककोंडीने धारण केलेले उग्र रूप, पार्किंगच्या समस्येत पालिकेच्या जबर दंडाची भर अशा स्थानिक प्रश्नांसोबतच मंदावलेली अर्थव्यवस्था आदी मुद्दे विरोधकांकडून मांडण्यात आले. मात्र, सत्ताधारी भाजप-शिवसेना नेत्यांनी कलम ३७०, राष्ट्रवाद, वीर सावरकरांना भारतरत्न हे मुद्दे पुढे आणले. विरोधकांनी प्रश्न विचारावे आणि सत्ताधाºयांनी खुलासा करावा हा नेहमीचा शिरस्ताच त्यामुळे बदलून गेला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा अपवाद वगळता एकाही काँग्रेस नेत्याला सत्ताधाºयांचा सापळा तोडता आला नाही. वीर सावरकरांचा सन्मान काँग्रेसनेच केला, आमचा विरोध त्यांनी मांडलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेपुरताच होता, अशी पॉलिटिकल करेक्ट भूमिका सिंग यांनी मांडली. परंतु तोवर उशीर झाला होता. शिवाय, त्यांचा हा युक्तिवाद पुढे नेण्याची सवड आणि इच्छा स्थानिक काँग्रेस नेत्यांकडे दिसली नाही.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर आरे येथील कारशेड आणि पीएमसी बँकेचा मुद्दा तापला. या मुद्द्यांवर मुंबईकर व्यक्त होत होते. पण या विषयांवर हजेरी लावल्यासारखे आरे वसाहतीला भेटी आणि माध्यमांना बाईट देण्यापलीकडे काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून कोणतेच प्रभावी आंदोलन झाले नाही. विरोधकांच्या या थंड्या प्रतिसादामुळेच आरेप्रकरणी प्रशासनाला आक्रमक भूमिका घेणे सोपे गेले. पाच वर्षांत जीएसटी, नोटाबंदी वगैरे मुद्द्यांवर विरोधकांनी आवाज उठविला होता. मात्र, त्याला जनतेकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्या तुलनेत आरेबाबत नेमके उलट घडत होते. समाजमाध्यमांतून जनताच पुढाकार घेत असताना त्याला योग्य प्रतिसाद देण्यात विरोधक अपयशी ठरल्याची कबुली मुंबई काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याने दिली.
शिवसेना-भाजपने आधीचा पालिका, विधानसभा, लोकसभेचा प्रचार डोळ्यांसमोर ठेवून प्रचाराचे नियोजन केल्याचे जाणवले. मनसेने आपला परिसर पक्का केल्याप्रमाणे राज ठाकरे यांच्या सभा पार पाडल्या. त्याचे सोशल मीडियातून योग्य मार्केटिंगही केले. त्या तुलनेत अन्य विरोधकांच्या प्रचारातही सुसूत्रतेचा अभाव होता. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची कांजूरमार्ग येथे एकमेव सभा झाली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी एक दिवस मुंबई दौºयावर आले. परंतु, धारावी आणि चांदिवलीपुरताच त्यांचा प्रचार मर्यादित राहिला. राहुल यांच्या दौºयाच्या निमित्ताने मुंबईभर वातावरण निर्मितीतही मुंबई काँग्रेसचे नेते अपयशी ठरले. राजस्थानी-मारवाडी मतदार खेचण्याच्या उद्देशाने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत मुंबईत आले. मुंबादेवी, कुलाबा, मलबार हिल आणि धारावीतील उमेदवारांसाठी त्यांनी प्रचारसभाही केल्या. मात्र, गेहलोत यांचा मुंबईतील राजस्थानी, मारवाडी समाजातील प्रभाव लक्षात घेत अधिक परिणामकारकपणे त्यांच्या दौºयाचे नियोजन करणे आवश्यक होते. तशीही तोशीस कोणी घेतली नाही.