Maharashtra Election 2019: पार्किंगच्या समस्येमुळे रहिवाशांमध्ये रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 04:49 AM2019-10-12T04:49:17+5:302019-10-12T04:49:45+5:30
दादर, माहिम परिसरात अनेक ठिकाणी पागडी पद्धतीवरील इमारती आहेत, तसेच अनेक जुन्या इमारती असल्याने तेथे पार्किंगची सोय नाही.
मुंबई : रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग रोखण्यासाठी महापालिकेने सार्वजनिक वाहनतळांच्या पाचशे मीटर परिसरात वाहन उभे करण्यास मनाई केली आहे. त्यानुसार, दंडात्मक कारवाई सुरू आहे. मात्र, पालिकेच्या या सक्तीचा नाहक भुर्दंड स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत आहे. माहिम विधानसभा मतदारसंघात याचे तीव्र पडसाद उमटत असून, नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे.
दादर, माहिम परिसरात अनेक ठिकाणी पागडी पद्धतीवरील इमारती आहेत, तसेच अनेक जुन्या इमारती असल्याने तेथे पार्किंगची सोय नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना रस्त्यावरचं आपले वाहन उभे करावे लागत आहे. मात्र, महापालिकेच्या नवीन नियमानुसार रस्त्यावर गाडी उभी असल्यास थेट दहा हजार रुपए दंड ठोठाविण्यात येतो.
स्थानिक रहिवाशांना या कारवाईतून वगळावे, अशी मागणी जोर धरत आहे.
दादर पश्चिम येथे महापालिकेने कोहिनूर सार्वजनिक वाहनतळाच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. मात्र, आपली वाहने तिथे उभी करून पायी अथवा टक्सीने घरी जावे लागत असल्याने नागरिक त्रस्त
आहेत. स्थानिक रहिवाशांच्या वाहनांना स्टिकर लावून घराजवळ पार्किंगची मुभा असावी, अशी विनंती स्थानिकांनी महापालिका प्रशासन, स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांकडे केली आहे.
आमची वाहने कोहिनूर येथे उभी करून टक्सीने घर गाठायचं का? मग त्या वाहनाचा उपयोग काय? येथे गोखले रोडवर पाण्याचे टँकर उभे असतात. जवळ सीएनजी भरणा केंद्र असल्याने टॅक्सींची रांग लागते. त्यावर कोणाचा वचक नाही. आमच्या वाहनांना घरावळचं पार्किंग करण्यास द्यावे, हवे असल्यास सर्व पुरावे देतो, स्वखर्चाने स्टिकर बनविण्यास आम्ही तयार आहोत.
- काश्मिरा पाटकर
(स्थानिक रहिवाशी)
स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता हा नियम लागू होऊन कारवाईला सुरुवात झाली. आमच्या इमारतीजवळ पार्किंगची सोय नाही, तर आम्ही गाड्या वापरायच्या नाहीत का? वारंवार नाराजी व्यक्त करूनही पालिकेने आमचा विचार केलेला नाही. आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
- विकास वैद्य
(स्थानिक रहिवाशी)