स्नेहा मोरे
मुंबई - ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरेवरळी विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. वरळीतून आदित्य यांना उमेदवारी मिळाल्याने त्याविरोधात मनसे, आघाडीने त्या तोडीचा उमेदवार दिला नव्हता. मात्र आता वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या या यादीत वरळीतून माजी पोलीस अधिकाऱ्याला उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे. गौतम गायकवाड असे उमेदवाराचे नाव आहे. गायकवाड हे माजी पोलीस अधिकारी आहेत. गुरुवारी युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून वरळी मतदार संघातून उमेदवारीचा अर्ज भरला. पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणूक लढत असल्याने शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. आता वंचितने या मतदार संघात उमेदवारी जाहीर केल्याने सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
यंदाच्या निवडणुकीच्या या रणांगणात सर्वाधिक लक्ष लागून राहिलं आहे वरळी मतदारसंघाकडे. ठाकरे घराण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घरातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. वरळी मतदारसंघातून निवडणूक लढविणारे आदित्य ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये आदित्यकडे एकूण 11 कोटी 38 लाखांची संपत्ती आहे. यामध्ये 10 कोटी 36 लाखांच्या बँक ठेवींचा समावेश आहे.
आदित्य यांच्याकडे 64 लाख 65 हजार दागिने आणि 20 लाख 39 हजार रुपयांचे बॉन्ड्स आहेत. याशिवाय आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू कारदेखील आहे. या कारची किंमत 6 लाख 50 हजार असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे. तसेच शिवसेना या पक्षाची ओळख आक्रमकरित्या आंदोलन करणारी संघटना म्हणून होती. अनेक आंदोलनाच्या माध्यमातून शिवसैनिकांवर गुन्हे नोंद आहे. राजकीय व्यक्तीवर कोणताही गुन्हा नोंद नाही असं किंबहुना कधी झालेलं ऐकण्यात आलं नाही. मात्र एकमेव आदित्य ठाकरे असे आहेत की त्यांच्यावर आजतागायत एकाही गुन्ह्याची नोंद नाही.