Maharashtra Election 2019: परतीच्या पावसाने झोडपले; मतमोजणीवरही सावट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 04:25 AM2019-10-23T04:25:22+5:302019-10-23T06:07:12+5:30
Maharashtra Election 2019: राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू असून, पावसाने शेतीचे नुकसान केले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. आणखी ४ दिवस पावसाची शक्यता असून, २४ च्या मतमोजणीवरही पावसाचे सावट आहे.
मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू असून, पावसाने शेतीचे नुकसान केले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. आणखी ४ दिवस पावसाची शक्यता असून, २४ च्या मतमोजणीवरही पावसाचे सावट आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
कोकण किनारी सोसाट्याचा वारा वाहील. २५ ऑक्टोबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. २६ ऑक्टोबर रोजी गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. स्कायमेटच्या अंदाजानुसार कर्नाटकच्या किनारपट्टीवर आणखी एक हवामान प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे. यामुळे दक्षिण कोकण आणि गोवा, विदर्भातील काही भाग आणि दक्षिण मराठवाड्यात २७ ऑक्टबरच्या सुमारास पावसात वाढ होईल.