मुंबई - रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी रिपाइंतर्फे मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची अधिकृत घोषणा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. बांद्रा येथील संविधान निवसस्थानी गौतम सोनवणे यांनी आज रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यापूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले यांच्यात चर्चा झाली असून या मतदारसंघात शिवसेना उमेदवाराची डोकेदुखी कमी झाली आहे.
तसेच राज्यात ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत तेथे रिपाइंने दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत उद्धव ठाकरे आणि केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी मानखुर्द शिवाजी नगर येथे दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत विनंती केली. मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून गौतम सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा त्यांना पुढील काळात सत्तेत चांगली संधी देऊन त्यांचे सन्मानाने सत्तेत सहभाग देण्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले आहे.
दरम्यान, राज्यात रिपाइं भाजप शिवसेना महायुती अभेद्य असून महायुतीला विजयी करण्यासाठी रिपाइं साथ देणार असल्याचे रामदास आठवले यावेळी म्हणाले. तसेच रामदास आठवले यांचा आदेश मान्य करून आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे गौतम सोनवणे यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच आठवले यांनी मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात आहे तरी शिवसेनेने सामाजिक दृष्ट्या विचार करून ती जागा रिपाइंला सोडायला हवी अशी मागणी केली होती. मात्र शिवसेनेने विठ्ठल लोकरे यांना मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत. रिपाइंसाठी आनंदाची बाब म्हणजे भाजप मधील काही कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यानुसार नांदेड मधील भाजपचे नेते राजेश पवार यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला असून त्यांना रिपब्लिकन पक्षाची अधिकृत उमेदवारी नायगाव विधानसभा मतदारसंघातून दिली आहे. तसेच परभणीचे भाजप नेते आमदार मोहन फड यांनी रिपाइं मध्ये प्रवेश केला असून त्यांना रिपब्लिकन पक्षाची अधिकृत उमेदवारी पाथरी विधानसभा मतदारसंघातून देण्यात आली आहे.