भाजपाने रासपशी गद्दारी केली तरीही त्यांच्यासोबत कायम राहणार; युतीपुढे जानकर हतबल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 02:11 PM2019-10-07T14:11:26+5:302019-10-07T14:13:23+5:30
राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना-भाजपासोबत कायम राहणार आहे.
मुंबई - जिंतूर आणि दौंड ही जागा महायुतीमध्ये रासपला सोडण्यात आलेली असताना त्याजागी भाजपाने उमेदवारांना एबी फॉर्म देऊन कमळ चिन्हावर लढण्यास भाग पाडले. त्यामुळे रासपच्या सर्व कार्यकर्त्यांचे संतुलन बिघडलं आहे, मलादेखील या निर्णयाने वाईट वाटलं. ज्यांनी भाजपाचे एबी फॉर्म घेतले त्या राहुल कुल आणि मेघना बोर्डीकर यांची रासपमधून हकालपट्टी केल्याची माहिती रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी दिली आहे तसेच मुख्यमंत्र्यांनी, प्रदेशाध्यक्षांनी आश्वासन दिलं तरीही मला फसविले, भाजपाने रासपाशी गद्दारी केली अशी खंत जानकरांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना महादेव जानकर म्हणाले की, राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना-भाजपासोबत कायम राहणार आहे. जिंतूर आणि दौंडबाबत कार्यकर्ते निर्णय घेतील. उद्धव ठाकरेंनी जे वक्तव्य केलं होतं की, मित्रपक्षांना भाजपाने जागा दाखविली, ते योग्य आहे. शिवसेनाही जात्यात आहे, मी पण भरडला जातोय, राहुल कुलने माझ्यासोबत गद्दारी केली. चांदा ते बांदा माझी कार्यकर्त्यांची फळी आहे. वेळ निघून गेली आहे. आता गंगाखेडची एकमेव जागी रासपचा उमेदवार निवडणूक लढविणार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आमचा पक्ष युतीसोबत राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे. गंगाखेडच्या जागेसाठी शिवसेना-भाजपाने सहकार्य करावं, मी इतर जागी त्यांचा प्रचार करण्यास तयार आहे. राहुल कुल, मेघना बोर्डीकर यांचा रासपशी काहीही संबंध नाही, रत्नाकर गुट्टे गंगाखेडमधून एकमेव अधिकृत रासपाचा उमेदवार आहे. माझी अवस्था इकडं आड अन् तिकडं विहीर आहे. सबुरीने घ्यावं लागणार आहे. उतवळपणा करुन काय हाती येणार नाही अशी हतबलता महादेव जानकर यांनी व्यक्त केली.
मित्रपक्षांना कमळ चिन्हावरच लढण्याचा आग्रह भाजपने धरला होता. यामुळे महायुतीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारापासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. सोमवारी मुंबई नरीमन पॉइंट येथील पक्ष कार्यालयात राज्य पक्ष कार्यकारिणची तातडीने बैठक बोलवण्यात आली. मात्र या बैठकीतच रासपने आगामी निवडणुकीत महायुतीसोबतच कायम राहण्याची भूमिका घेतली.