मुंबई : आपल्या मतदारसंघात प्रतिस्पर्धी कोण? हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर बहुतांशी उमेदवारांनी रविवारपासून प्रचाराचा बार उडविला आहे. मात्र, दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्वच मतदारसंघामध्ये प्रचाराने जोर धरला आहे. मतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उमेदवार दारोदार फिरू लागले आहेत. प्रसंगी नागरिकांच्या रोषालाही सामोरे जात उमेदवार स्थानिक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.दक्षिण मध्य मुंबईतील मराठमोळ्या विधानसभा मतदारसंघात दसºयाच्या मुहूर्तावर उमेदवारांची बाईक रॅली निघाली होती. मराठी पारंपरिक वेशभूषांमधील महिला व पुरुष कार्यकर्त्यांची फौज घेऊन उमेदवारांनी मतदारांना दसºयाच्या शुभेच्छा दिल्या. या मिरवणुकीत उपस्थिती लावणाºया नागरिकांबरोबर संवाद साधत, त्यांच्या समस्या जाणून घेताना उमेदवार दिसत होते, तर काही ठिकाणी सेलिब्रिटी प्रचारात उतरलेले दिसून येत आहेत. त्यांच्या लोकप्रियेमुळे स्थानिक नागरिकही या प्रचारामध्ये सहभागी होऊन आपल्या मतदारसंघातील उमेदवारांविषयी जाणून घेण्यास उत्सुकता दाखवित आहेत. माहिम विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या वतीने बिग बॉस फेम शिव ठाकरे, नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर प्रचारात रंगत आणत आहेत. त्याच वेळी देशपांडे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे सदानंद सरवणकर यांनी प्रभादेवी ते माहिम मच्छीमार नगरपर्यंत बाइक रॅली काढली होती.वडाळा मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले कालिदास कोळंबकर यांना भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील नाराजांचा सामना करावा लागतआहे. आयाराम असल्यानेकोळंबकर यांच्या उमेदवारीबाबत भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये रोष होता. मात्र, मिहिर कोटेचा यांना मुलुंडमध्ये उमेदवारी मिळाल्यामुळे आता भाजपचे स्थानिक कार्यकर्तेही कोळंबकर यांच्याबरोबर प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत.
Maharashtra Election 2019 : स्थानिक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 5:25 AM