मुंबई : भायखळा मतदारसंघात सकाळपासून मतदारांचा निरुत्साह दिसून आला. सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेत दुपारचे दोन वाजून गेले तरीही मतदारांनी तितकासा उत्साह दाखविला नाही. परिणामी, या पार्श्वभूमीवर पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांनी मतदारांना जागरूक करून मतदान करण्यास बाहेर पडण्याचे आवाहन केले.
भायखळा येथील ग्लोरिया चर्च येथील शाळेतील मतदान केंद्रात ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह दिसून आला. तर भायखळा पूर्व येथील पारसी निवासी वसाहत येथील रहिवाशांनी वसाहतीत स्थानिकांमध्ये मतदानासाठी जनजागृती केली. तर काहींनी थेट वाहनाची सोय करीत ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली. भायखळा पश्चिम येथील पालिकेच्या शाळेत बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात दिला.
दुचाकीचा अपघात होऊनही गाठले मतदान केंद्र
भायखळा पश्चिम येथील दगडीचाळ नजीक पालिकेच्या शाळेत असणाºया मतदारसंघात ५३ वर्षीय आरिफा अन्सारी यांनी वॉकरच्या साहाय्याने चालत हजेरी लावली होती. साधारण दोन किलोमीटरचे अंतर भर उन्हात वॉकरच्या साहाय्याने पार करत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
आरिफा यांचा काही महिन्यांपूर्वी दुचाकीने धडक दिल्यामुळे अपघात झाला आहे. त्यातून त्यांची प्रकृती अजूनही बरी झाली नसून उपचार अजूनही सुरू आहेत. याविषयी, आरिफा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आपण घरात बसून यंत्रणांना दोष देतो, आरडाओरडा करतो; मात्र त्याविषयी जेव्हा हक्क बजावण्याची वेळ येते तेव्हा मात्र तो बजावत नाही. त्यामुळे याच विचाराने मी इथवर येऊन माझे राष्ट्रीय हक्क बजावल्याचे समाधान आहे.