Join us

महाराष्ट्र निवडणूक २०१९: सचिन तेंडुलकरसह दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 1:17 PM

सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या १३व्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, सुमारे 9 कोटी मतदार या निवडणुकीत उतरलेल्या 3237 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. 

सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे. राज्यातील दिग्गजांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी मुंबईतील अनेक सेलिब्रिटींनी अतिशय उत्साहात मतदान केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या कुटुंबासह वांद्रे येथील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सचिनची पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुन यानेही मतदान केले. आपल्या सुरक्षित भविष्यासाठी मतदान गरजेचे आहे. त्यामुळे मतदान नक्की करा, असे आवाहन सचिनने यावेळी केले आहे. तसेच, 'मतदान करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. माझं मत मी नोंदवलं आहे, आपण सर्व सुद्धा मतदान करून या लोकशाहीच्या सोहळ्याचा भाग व्हा.' असे ट्विटही सचिनने केले आहे. 

दरम्यान, राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे. केंद्रीय नेते नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुधीर मुंनगंटीवार, बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, उदयनराजे भोसले, एकनाथ शिंदे, अविनाश जाधव, सत्यजित तांबे, इम्तियाज जलील, राधाकृष्ण विखे-पाटील, गणेश नाईक यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी मतदान केले. 

दरम्यान, एक वाजेपर्यंत राज्यात 19.47 टक्के मतदान झाले आहे. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विधानसभेच्या 288 जागांसाठी 3237 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019सचिन तेंडुलकरराजकारणमहाराष्ट्रनिवडणूक