मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच आहेत, खुद्द उद्धव ठाकरेंनीच तसं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या रूपाने राज्याचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असा शब्दांचा खेळ करणाऱ्या भाजपा नेतृत्वावर खासदार संजय राऊत यांनी तीक्ष्ण शाब्दिक बाण सोडला आहे.
शिवसैनिक रोज खोटं बोलत नाही. तो दिलेल्या शब्दाला जागतो, वचनाला जागतो. सत्तेसाठी, खुर्चीसाठी तो खंजीर खुपसत नाही. प्राण जाए पर वचन न जाए, हा आमच्यावरचा बाळासाहेबांचा संस्कार आहे. त्यामुळे कुणी स्वतःला शिवसैनिक म्हणवत असेल तर त्याने शिवसैनिकांचे संस्कारही समजून घ्यावेत, अशा हल्ला चढवत, संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.
...तर भाजपा नेत्यांनी फोन करावा; अखेर उद्धव ठाकरे चर्चेला तयार, अटी-शर्ती लागू
उद्धव ठाकरेंचं 'युती'बद्दल मोठं विधान; शिवसेनेनं भाजपावर आणखी वाढवला दबाव
गेल्या १४ दिवसांत न सुटलेला राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी किती काळ कायम राहणार, असा प्रश्न निर्माण होतोय. कारण, मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून शिवसेना हटत नाहीए आणि ते सोडायला भाजपा तयार होत नाहीए. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असं संजय राऊत ठामपणे म्हणत आहेत. त्यावरून आज भाजपा नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थोडा शब्दांचा खेळ केला. उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस हे मोठे भाऊ मानतात. तसं त्यांनी भर सभेत जाहीर केलंय. तसंच, देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिक असल्याचं उद्धव यांनीच म्हटलंय. त्यामुळे देवेंद्र यांच्या रूपाने शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार आहे, अशी जुळवाजुळव त्यांनी केली. त्याबद्दल राऊत यांना विचारलं असता, त्यांनी जरा घुश्श्यातच मुनगंटीवार आणि फडणवीसांवर निशाणा साधला.
बच्चू कडूंनी सुचवली भन्नाट युक्ती; भाजपा-शिवसेना दोघांचीही होईल 'स्वप्नपूर्ती'
असा असणार उद्धव ठाकरेंचा 'ए'-'बी' प्लॅन; शिवसेनेच्या आमदारानेच केला खुलासा
मुनगंटीवार आणखी किती नाती जन्माला घालतात आणि लाडवांचं जेवण घालतात, मला माहीत नाही. पण अशा उपमा आणि अलंकार वापरून काही होणाार नाही. स्वतःला शिवसैनिक मानत असाल तर आमचे संस्कारही समजून घ्या, असं त्यांनी सुनावलं. युती तोडण्याचं आणि दुसरा पर्याय स्वीकारण्याचं पाप आम्ही करणार नाही, ही उद्धव ठाकरेंची भूमिका आजही कायम आहे. परंतु, भाजपाची भूमिका कायम आहे का?, असा सवाल त्यांनी केला. सरकार स्थापन न करून भाजपा राज्याचं नुकसान करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
स्वतःही सरकार स्थापन करायचं नाही आणि घटनात्मक पेच निर्माण करायचे, हे फार काळ चालणार नाही. राज्यघटना ही तुमची जहागिरी नाही. सरकार बनवण्यास असमर्थ आहोत, हे भाजपाने जाहीर करावं, मग शिवसेना पावलं उचलेल. कायद्याच्या चौकटीत राहूनच शिवसेना मुख्यमंत्री विराजमान होईल. आमच्याकडे संख्याबळ आहे, ते सभागृहात दाखवू, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.