मुंबई - विधानसभा निवडणुकीनिमित्त राज्यातील राजकारणाला वेग आलेला असताना पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीबद्दल लोकांना माहिती मिळत आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातूनआदित्य ठाकरे निवडणूक लढवित आहे. आज आदित्य यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून आदित्य यांच्याकडे 11 कोटींची संपत्ती असल्याचं जाहीर झालं आहे.
आदित्यकडे एकूण ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती आहे. यामध्ये १० कोटी ३६ लाखांच्या बँक ठेवींचा समावेश आहे. आदित्य यांच्याकडे ६४ लाख ६५ हजार दागिने आणि २० लाख ३९ हजार रुपयांचे बॉन्ड्स आहेत. याशिवाय आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू कारदेखील आहे. या कारची किंमत ६ लाख ५० हजार असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे. मात्र या प्रतिज्ञापत्रात आदित्य यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीबाबतही माहिती देण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे 54 लाख 39 हजार 66 रुपये बँकठेवी आहेत. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 37 लाख 5 हजार 471 रुपये, ICICI बँकेत 12 हजार 891 रुपये, तर IDBI बँकेत 8 लाख 67 हजार 95 रुपये आहेत. तर फिक्स डिपॉझिटम्हणून ICICI बँकेत 2 लाख 82 हजार 563 रुपये तर 20 मार्च 2019 ला 5 लाख 71 हजार 46 रुपये डिपॉझिट करण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरेंकडे विविध कंपन्यांचे 37 लाख 72 हजार 90 रुपयांचे शेअर्स आहेत. यात बायो ग्रीन पेपर लि. जीटीएल कंपनी, मारुती उद्योग लिमिटेड, मेस्यू कारा अॅँन्ड सनग्रेस मफतलाल लिमिटेड यामध्ये पैसे गुंतविण्यात आले आहेत. त्याचसोबत उद्धव ठाकरेंकडे 46 लाख 23 हजार 68 रुपयांचे दागिने आहेत अशी माहिती या प्रतिज्ञापत्रात जोडण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे हे उद्योग करतात. यातून त्यांना ही कमाई झाली आहे. आदित्य ठाकरेंनी 5 बँकेत आपले पैसे ठेवले आहेत. यातील एक बँक अशी आहे की, यात आदित्यने फक्त 276 रुपये ठेवले आहेत. भवानी सहकारी बँकेत आदित्यचे 276 रुपये आहेत. तर इंडियन ओवरसीज बँकेत 1 हजार रुपये ठेवले आहेत. सर्वाधिक पैसे एचडीएफसी बँकेत 5 कोटी 78 लाख 3 हजार 334 रुपये आहेत. त्यापाठोपाठ सारस्वत बँकेत 1 लाख रुपये, ICICI बँकेत 43 हजार 729 रुपये ठेवले आहेत. तसेच विविध कंपन्यांचे शेअर्स त्यांनी घेतलेले आहेत.