Maharashtra Election 2019 : शिवसेनेची भाजपवर ‘अ’घोषित कुरघोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 04:30 AM2019-10-11T04:30:57+5:302019-10-11T04:35:01+5:30

भाजपचा जाहीरनामा अजून प्रसिद्ध झालेला नाही. ती संधी साधून उद्धव ठाकरे रोज नवी घोषणा करत आहेत.

Maharashtra Election 2019: Sena promises Rs 10-meals if it is voted to power, its slammed for bjp | Maharashtra Election 2019 : शिवसेनेची भाजपवर ‘अ’घोषित कुरघोडी

Maharashtra Election 2019 : शिवसेनेची भाजपवर ‘अ’घोषित कुरघोडी

Next

- नंदकिशोर पाटील

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणांचा धडाका लावला असून रोज एक नवी घोषणा ते करत आहेत. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व भाजप नेते ‘कलम ३७०’ वर भर देत असल्याचे प्रचाराच्या रणधुमाळीत दिसून येत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात घोषणांचा पाऊस पाडला. राज्यात पुन्हा सत्ता आल्यानंतर दहा रुपयांत सामान्य माणसांना सकस जेवण दिले जाईल. एक रुपयात हृदयरोग आणि अन्य आरोग्य चाचण्या करण्यासाठी केंद्र उभे केले जाईल. महिलांच्या सुरक्षिततेसाठी बससेवा सुरू केली जाईल तसेच ३00 युनिटपर्यंतचा वीजदर ३0 टक्के कमी केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. दहा रुपयांत जेवण ही ‘झुणका-भाकर’ योजनेचीच पुनर्रावृत्ती आहे. झुणका -भाकर योजना चालली नसली तरी या योजनेच्या नावाखाली मोक्याच्या सरकारी जागा बळकावण्यात आल्या. तामिळनाडुत अम्मा कँटिनच्या धर्तीवर आमची ही दहा रुपयात थाळी योजना असल्याने शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र शिवसेनेच्या या घोषणा आकर्षक असल्यातरी कितपत व्यवहार्य आहेत, याविषयी राजकीय जाणकार साशंक आहेत.
भाजपचा जाहीरनामा अजून प्रसिद्ध झालेला नाही. ती संधी साधून उद्धव ठाकरे रोज नवी घोषणा करत आहेत. बुधवारी अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभांमधून त्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसह दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा हजार रुपये जमा केले जातील, अशी नवी घोषणा करून भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. विशेषत: सरसकट कर्जमुक्ती आणि दहा हजार रुपयांचे आश्वासन सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची हवा काढणारे आहे. अलिकडच्या काळात शिवसेनेने कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याचे दिसते. राम मंदिराच्या मुद्यावर जाहीरपणे बोलू नये, अशी ताकीद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली असताना उद्धव आपल्या भाषणात वारंवार राम मंदिराचा उल्लेख करत आहेत. शिवाय, कलम ३७0 रद्द करण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले असे सांगतानाच आता अमित शहा यांनी बांग्लादेशी घुसखोरांना देशाबाहेर घालवावे, अशी मागणी करून त्यांनी आपला चेंडू भाजपच्या कोर्टात टोलविला आहे.
या उलट, भाजप नेत्यांनी काश्मीरसंदर्भातील कलम ३७०, हवाई दलात नुकतेच दाखल झालेले राफेल विमान, बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक या मुद्यांवरच प्रचारात भर देताना दिसत आहेत.

दहा रुपयांत भरपेट थाळी!
तामिळनाडुतील अम्मा कँटिनच्या धर्तीवर शिवसेनेने ‘दहा रुपयांत थाळी’ ही योजना जाहीर केली आहे. मात्र, दहा रुपयांत जेवण देणाºया या खानावळी चालविणार कोण, सरकार की शिवसैनिक? हे स्पष्ट केलेले नाही. १९९५ साली सत्तेवर आल्यानंतर शिवसेनेने अशीच ‘झुणका-भाकर’ योजना सुरु केली होती. मात्र पुढे झुणकाही गेला अन् ्भाकरही !

महाजनादेश नेमका कुणाला?
विधानसभा निवडणुकीत भाजप १६४ आणि शिवसेना १२४ जागा लढवित आहेत. दोघांची युती असली तरी प्रचार संयुक्तिक नाही. शिवाय, दोन्ही पक्षाच्या जाहिरातीतील मुद्देही वेगळे आहेत. ‘हीच ती वेळ...शिवसेना सरकार!’ अशा आशयाचे होर्डिग्ज मुंबईभर झळकले आहेत, तर दुसरीकडे भाजपने केलेल्या जाहिरातीत ‘महाजनादेश भाजपला’ असल्याचं म्हटलं आहे.

- भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी नेते ‘कलम ३७०’वर बोलत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रोज नवनव्या ‘कल्याणकारी’ घोषणा करत आहेत !

कोणी, कितीही घोषणा केल्यातरी राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेतले जातील.
-गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री

Web Title: Maharashtra Election 2019: Sena promises Rs 10-meals if it is voted to power, its slammed for bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.